Bigg Boss Marathi 6 Divya Shinde Ejected : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून शॉकिंग अपडेट समोर आली आहे. घरातील सदस्यांना टास्क संपल्यावर धमकी दिल्यामुळे ‘बिग बॉस’ने दिव्याला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं? दिव्याने सर्वांना धमकी दिल्यावर ‘हो! मी धमकी दिली’ ही गोष्ट मान्य सुद्धा केली. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

चेहऱ्यावर फुली मारण्याच्या टास्कदरम्यान तन्वी आणि दिव्यामध्ये मोठा वाद झाला. यावेळी ‘बिग बॉस’ने मध्यस्थी करून दिव्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण, दिव्या काही करून ऐकत नव्हती. ती एवढ्यावरच थांबली नाही. शेवटी टास्क संपल्यावर दिव्या सर्वांसमोर उभी राहिली आणि म्हणाली, “बिग बॉस मी आधीच ही गोष्ट सांगते की, मला तुमच्याबद्दल आदर आहे. तुमच्यावर विश्वास ठेऊन मी इथे आलेय…मला तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाहीये. पण, एक गोष्ट मला इथे बोलायची आहे. मला खूप लोकांकडून एक गोष्ट सारखी ऐकू येत होती ती म्हणजे मी शोमध्ये बाहेरच्या गोष्टी बोलते. मला आठवत नाहीये मी नेमकं काय बोलले. पण, सर्वांना ऐकायचंच आहे तर एक गोष्ट मला सर्वांना खूप अधोरेखित करून सांगायची आहे.”

दिव्याकडून अन्य सदस्यांना धमकी

दिव्या पुढे म्हणाली, “मी बाहेर ‘सरकार’ म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. भलेही ती तलवार आता घरी असेल…याचा अर्थ असा नाही की, मी इथल्या गोष्टी विसरेन…मी बाहेर जाऊन ती तलवार चालवेन. आता ती तलवार कोणावर चालवेन हे डिपेंड करतं तुम्ही माझ्याशी किती आणि कसे बोलताय.”

यानंतर रुचिता तिला विचारते, “ही धमकी समजायची का आम्ही?” यावर दिव्या म्हणते, “हो ही धमकीच आहे.”

तन्वी, रुचिता, अनुश्री या तिघी सुद्धा दिव्याच्या या वक्तव्यानंतर हे अगदी चुकीचं आहे असं तिला ओरडून सांगू लागतात. अगदी दिव्या ज्याला घरात मोठा भाऊ मानते त्या राकेश बापटला सुद्धा तिचं हे बोलणं पटत नाही.

…अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत

घरातील वाढलेला गोंधळ पाहून बिग बॉस म्हणतात, “दिव्या अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. आता एकही शब्द बोलायचा नाही. ‘बिग बॉस’ जे बोलत आहेत ते ऐकून घ्या…इतरवेळी तुम्ही संविधानाच्या, मानवी हक्काच्या गोष्टी करता, महापुरुषांचे विचार मांडता आणि इथे येऊन धमकी देताय?” यावर दिव्याने ‘हो’ असं उत्तर दिलं. आणि दिव्या शेवटपर्यंत ‘हो ही धमकीच आहे’ असं म्हणत होती.

यानंतर कन्फेशन रूममध्येही दिव्याने समजूतदारपणा दाखवला नाही. ‘बिग बॉस’ने भरपूर वेळ समजावून सुद्धा, “मी अशीच आहे RB मी माफी मागणार नाही” या मतावर दिव्या ठाम होती.

बिग बॉस पुढे म्हणाले, “मी आता स्पष्ट शब्दांत सांगतो, आपण नॅशनल टेलिव्हिजनवर घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देताय…याचं आपण काय स्पष्टीकरण देणार? दिव्या बाहेरील आयुष्यात आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल गर्व असेल जे चुकीचं आहे. पण, हा एक शो आहे; जो करोडो लोक पाहतात. इथे हे मान्य करता येणार नाही. बिग बॉस असा सल्ला देतात की, आता डोकं शांत करा…यावर चर्चा नको. बाकी या विषयावर बिग बॉस गांभीर्याने विचार करतील, तज्ज्ञांचे सल्ले घेतील.”

यानंतरही दिव्या ‘मी माफी मागणार नाही’ या मतावर ठाम होती. शेवटी तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दिव्याला शोमधून निष्कासित करण्यात आलं आहे. भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला. दिव्या तेव्हा सुद्धा कोणालाही ‘सॉरी’ न म्हणता घराबाहेर पडली.