Bigg Boss Marathi 6 Eviction : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतंच १२ व्या आठवड्याचं एलिमिनेशन पार पडलं आहे. यावेळी घरातील एकूण ६ सदस्य नॉमिनेट होते. यांच्यामध्ये सागर कारंडे, राखी सावंत, राकेश बापट, अनुश्री माने, रेवा कौरासे, विशाल कोटियन या सदस्यांचा समावेश होता. खरंतर, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या नॉमिनेशन टास्कदरम्यान मोठा राडा पाहायला मिळाला होता.
राकेशने विशालला नॉमिनेट केल्यावर या दोघांमध्ये मोठा राडा झाला होता. विशालने राकेशच्या वैयक्तिक आयुष्यावर कमेंट केली, त्याच्या घटस्फोटाचा विषय शोमध्ये काढला. यामुळे राकेशच्या भावना दुखावल्या गेल्या, इतकंच नव्हे तर जाब विचारल्यावर विशाल राकेशच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्याचा परिणाम म्हणून बिग बॉसने या दोघांना थेट नॉमिनेट केलं होतं.
आता नॉमिनेशनची ही टांगती तलवार एकूण सहा सदस्यांच्या डोक्यावर होती. यांच्यापैकी घरातील कोणाचा प्रवास संपणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर सागर कारंडेने घराचा निरोप घेतल्याचं समोर आलं आहे.
सागर कारंडे गेल्या काही दिवसांपासून अनुश्री आणि विशालबरोबर गेम खेळताना दिसत होता. मात्र, तरीही सागरने स्वत:चा गेम खेळावा असं अनेक प्रेक्षकांचं म्हणणं होतं. त्यामुळेच खेळ अंतिम टप्प्यावर आलेला असताना सागरचं एलिमिनेशन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याची टॉप ७ मध्ये जाण्याची संधी थोडक्यात हुकली आहे.
सध्या घराचा ८४ वा दिवस सुरू आहे. येत्या काही दिवसांत शोमध्ये ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे सागरच्या एलिमिनेशननंतर ‘बिग बॉस मराठी’ला टॉप ७ स्पर्धक भेटणार आहेत. आता यांच्यामध्ये बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या १२ व्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने विशाल कोटियनची शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं. राकेशच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केल्यामुळे “महाराष्ट्राला हे पटलेलं नाहीये” असं म्हणत रितेशने सुद्धा विशालला सुनावलं आहे.
