Bigg Boss Marathi 6 fame Anushri Mane buys new house: आयुष्यात कितीही मोठे यश मिळाले, तरी जोपर्यंत माणसाच्या डोक्यावर स्वतःचे हक्क म्हणावे असे छत नसते, तोपर्यंत त्याचे आयुष्य थोडे अपूर्णच वाटते. घर कसंही असो, पण ते स्वतःच्या हक्काचं असावं, जिथे आपली माणसं अभिमानाने राहू शकतील. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व बिग बॉस मराठी ६ फेम अनुश्री मानेने हक्काचं घर घेतलं आहे. आपलं हक्काचं घर असावं, हे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अनुश्रीचं स्वप्न होतं. ते अखेर तिने पूर्ण केलं आहे. तिने नवीन घरात पूजा केली आणि गृहप्रवेश केला. पण अनुश्री मानेने हे घर कोणत्या शहरात घेतलं, ते तुम्हाला माहित आहे का?
अनुश्री मानेने मुंबई किंवा पुण्यात घर घेतलेलं नाही. खरं तर अनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये घर कुठे घेतलंय याचा उल्लेख केलेला नाही. पण तिच्या घराच्या वास्तू शांतीसाठी गेलेल्या काही जणांनी पोस्टमध्ये शहराचं नाव टाकलंय. त्यामुळे अनुश्रीने घर कोणत्या शहरात घेतलं, त्याबद्दल चाहत्यांना समजलं.
अनुश्री माने हिने पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेतलंय. तिच्या घराच्या वास्तू शांतीसाठी बिग बॉस मराठीतील अनेक सदस्यांनी हजेरी लावली होती. वस्त्रवेद बाय शुभांगी या पेजवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अनुश्रीच्या नवीन घराची आणि कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांची झलक पाहायला मिळतेय.
पाहा व्हिडीओ
अनुश्री मानेच्या या नवीन घरी तन्वी कोलते, रोशन भजनकर, ओमकार, रुचिता जामदार, विशाल कोटियन, राधा पाटील, प्रभू शेळके आले होते. सर्वांनी अनुश्री व तिच्या आईला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या. तर चाहतेही अनुश्री मानेचं या नवीन घरासाठी अभिनंदन करत आहेत.
अनुश्री मानेची पोस्ट
“भाड्याच्या एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. कितीतरी अश्रू, कितीतरी अपयश, कितीतरी जागलेल्या रात्री… पण स्वप्नांवरचा विश्वास कधी सोडला नाही.
आज माझ्या स्वतःच्या घराची वास्तुशांती करताना हवनाच्या त्या ज्वाळांमध्ये मला माझा संपूर्ण प्रवास दिसतोय.
हे घर फक्त विटा आणि सिमेंटचं नाही…
हे माझ्या आईच्या त्यागाचं, माझ्या कष्टाचं, आणि बाबांच्या आशीर्वादाचं स्वप्न आहे.
आज मन भरून आलंय…
कारण एकेकाळी डोक्यावर स्वतःचं छप्पर असावं असं स्वप्न पाहणारी मुलगी, आज तिच्या स्वतःच्या घरात देवाचं स्वागत करतेय.
बाबा, तुम्ही आज असता तर सर्वात जास्त आनंद तुम्हालाच झाला असता…”, अशी पोस्ट अनुश्री मानेने केली.
