Bigg Boss Marathi 6 Fame Raqesh Bapat Sister : ‘बिग बॉस मराठी’चे सहावे पर्व सुरू झाल्यापासूनच ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. घरातील विविध टास्क आणि घरातील स्पर्धकांमुळे शोची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. असाच चर्चेत राहणारा एक स्पर्धक म्हणजे राकेश बापट. चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला राकेश सध्या ‘बिग बॉस मराठी ६’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

‘बिग बॉस’च्या घरातील राकेशचा खेळ आणि स्वभाव त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्या स्वभावामुळे लक्ष वेधून घेणाऱ्या राकेशवर काही दिवसांपूर्वी अनुश्री मानेने चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला होता, यावर अनेकांनी त्याला पाठिंबा दिला. यात सगळ्यात आधी त्याच्या बाजूने बहीण शीतल यांनी पोस्ट शेअर केली होती. त्या कायमच भावाच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहतात.

राकेशचे त्याच्या बहिणीबरोबर खास नाते आहे आणि बहिणीबरोबरच्या या नात्याबद्दल त्याने विविध मुलाखतींमधून सांगितलेदेखील आहे. सोशल मीडियावरसुद्धा त्या सक्रिय असतात. त्या नक्की काय करतात माहितीय का?

राकेश बापटच्या बहिणीबद्दल…

शीतल बापट या पॅरेंटिंग कोच आहेत. त्या करिअर मार्गदर्शनसुद्धा करतात. याशिवाय त्या ‘श्यामची आई’ आणि ‘वन्स अ पॅरेंट’ या संस्थांच्या संस्थापकही आहेत. ‘वन्स अ पॅरेंट’ नावाच्या सोशल मीडिया पेजवर त्या पालकांना मार्गदर्शन करणारे व्हिडीओसुद्धा शेअर करत असतात. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी POSH कायद्याअंतर्गत येणाऱ्या कमिटीसाठी काम करत असल्याचेसुद्धा सांगितले.

त्या म्हणाल्या, “मी अशा अनेक केस पहिल्या आहेत, जिथे अनेक स्त्रियांना खरंच आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास होत असतो. स्त्रियांसाठी हे सगळे कायदे बनले आहेत, पण बऱ्याच ठिकाणी या कायद्याचा चुकीचा वापर केला जातो.” यापुढे त्यांनी अनुश्रीने राकेशवर केलेल्या आरोपांवरसुद्धा प्रतिक्रिया दिली.

राकेश बापट इन्स्टाग्राम पोस्ट

त्या म्हणाल्या, “राकेश असं काही करेल हा मुद्दाच नाही, कॅमेरे नसते तरी आमचा त्याच्यावर विश्वास आहे. पण, त्याच्याऐवजी कुणी दुसरं असतं तर त्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकलं असतं. ज्या स्त्रिया असं काही करतात, तेव्हा त्या पुरुषावर अन्याय होतोच; पण इतर स्त्रियांवरसुद्धा तो अन्याय असतो, यामुळे खरी बाजू मांडणाऱ्या स्त्रियांनासुद्धा यात न्याय मिळत नाही. मला तेव्हा राकेशबरोबर घडलं ते पटलंच नव्हतं. ते टीव्हीवर दिसलं आणि बऱ्याच लोकांनी विशेषत: स्त्रियांनी त्याची बाजू घेतली. जे झालं ते दुर्दैवी होतं; पण मला आणि आईला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता.”