Raqesh Bapat Sister Reaction On His Divorce : मालिका, चित्रपट तसंच रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला मराठी अभिनेता राकेश बापट सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राकेश याआधीही हिंदीतल्या ‘बिग बॉस’मध्ये झळकला होता. कामाबरोबरच राकेश त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत येत असतो. आतादेखील राकेशच्या खासगी आयुष्याबद्दलच्या चर्चा होताना दिसतात.
२०११ मध्ये राकेश आणि रिद्धीनं लग्न केलं; मात्र २०१९ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. पण, घटस्फोटानंतरही दोघांमधली मैत्री टिकून आहे. दोघे एकमेकांना कामासाठी पाठिंबा देताना दिसतात. एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात. नुकताच रिद्धीने राकेशच्या ‘बिग बॉस मराठी’च्या खेळाबद्दलचा व्हिडीओ शेअर केला होता.
अशातच नुकत्याच एका मुलाखतीत राकेशच्या बहिणीनं त्याच्या रिद्धीबरोबरच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिनं दोघे (राकेश आणि रिद्धी) एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि ते एकमेकांचा खूप आदर करतात, असं सांगितलं. राकेशची बहीण शीतल नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…
“त्यामुळे दोघांनी त्या नात्यातून बाहेर पडण्याचा पर्याय…”
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत राकेशची बहीण म्हणाली, “दोघेही (राकेश आणि रिद्धी) एकमेकांचा खूप आदर करतात. कुठल्याही नात्यात आदर महत्त्वाचा असतो; पण कधी कधी अपेक्षा वाढतात, तेव्हा नात्यात दुरावा येतो. त्यामुळे दोघांनी त्या नात्यातून बाहेर पडण्याचा पर्याय शोधून काढला. परंतु, दोघांची चांगली मैत्री आहे. दोघांनाही एकमेकांविषयी आदर आहे; पण जर एकमेकांशी जमत नाहीय, तर मग उगाच कटुता निर्माण करण्याला अर्थ नाही. नात्यात टॉक्सिकपणा नसला पाहिजे. राकेशला टॉक्सिसिटी आवडतच नाही. राकेश हा असाच आहे. तो कुणाचाच तिरस्कार करू शकत नाही किंवा रिद्धीसुद्धा ते करू शकत नाही. दोघांची मैत्री खूपच छान आहे.”
राकेश बापट-रिद्धी डोगरा यांच्या नात्याबद्दल माहिती…
दरम्यान, रिद्धी व राकेशबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी २०११ मध्ये लग्न केलं होतं; मात्र २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही त्यांच्यात उत्तम मैत्री आहे. दोघेही अनेक मुलाखतींमधून त्यांच्यात आजही चांगले बॉण्डिंग असल्याचे अनेकदा सांगतात. रिद्धी एका मुलाखतीत म्हणाली होती की, आम्ही घटस्फोट जरी घेतला असला तरी आम्ही आमची मैत्री टिकवली आहे.
काही दिवसांपूर्वीच्या एका भागात राकेशनं रिद्धीबरोबरच्या नात्याबद्दल राखीशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यानं, “आमचं आठ वर्षांचं रिलेशन होतं. २०२० मध्ये आमचा घटस्फोट झाला. आम्ही बांद्रा कोर्टामध्ये घटस्फोट घेण्यासाठी गेलो, तेव्हा सगळी जोडपी टेन्शनमध्ये होती. आम्ही त्यांच्याबद्दल गॉसिप करत होतो”, असं म्हटलं होतं. पुढे राखीनं त्याला, “आठ वर्षं खूप जास्त आहेत, तुम्ही मुलांचा विचार नाही का केला?” असं विचारलं. त्यावर राकेश म्हणालेला, “आम्ही केलेला विचार; पण अडचणी आलेल्या. मुलं असती तरी प्रॉब्लेम नसता झाला. कारण- आमचं चांगलं जमायचं.”
