Raqesh Bapat Sister On Rakhi Sawant : ‘बिग बॉस मराठी ६’ हा शो सुरू होऊन आता जवळपास दोन महिने झाले आहेत. यापैकी शोमधील काही स्पर्धकांचा प्रवास संपला आहे, तर काही नवीन स्पर्धकांचीसुद्धा एन्ट्री झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’च्या घरात ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचीसुद्धा एन्ट्री झाली.
‘बिग बॉस’च्या घरात राखीने एन्ट्री केल्यापासून प्रत्येक दिवशी नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. नवनवीन ड्राम्यांमुळे चर्चेत राहणारी राखी राकेश बापटबरोबरच्या नात्यामुळेसुद्धा चर्चेत आहे. राकेश आणि तन्वीचा डान्स पाहून राखी प्रचंड दुखावली होती. तिने स्वत:चे केस कापलेले. तसंच स्विमिंगपूलमध्ये उडीसुद्धा मारलेली.
राकेशनेसुद्धा राखीला आपल्यात केवळ मैत्री असल्याचे सांगितले आहे. अशातच आता राकेश बापटच्या बहिणीने राकेशच्या राखीबरोबरच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच राखीबद्दलसुद्धा त्यांनी मत व्यक्त केलं आहे.
“राकेश-राखी मित्र म्हणून…”
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राकेशची बहीण शीतल दोघांबद्दल म्हणाल्या, “मित्र म्हणून दोघे (राकेश आणि राखी) क्लास आहेत. राखी ही कमाल आहे. राखीचा जन्म हा फक्त मनोरंजनासाठी झाला आहे. तिच्या नसानसांत मनोरंजन आहे. मित्र म्हणून दोघे छान खेळत आहेत. मला दोघेही आवडतात. त्याने आधीच स्पष्टपणे सांगितलं आहे की, तो सध्या करिअर आणि कुटुंबालाच प्राधान्य देणार आहे, आपण फक्त चांगले मित्र आहोत.”
“राकेश कुणाच्याच प्रेमात…”
पुढे शीतल यांना “राकेश आणि राखी ही जोडी आवडलीय का?” असं विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या, “फक्त राखीचा प्रश्न नाही, तो आता कुणाच्याच प्रेमात पडण्यासाठी तयार नाही. त्याने ठरवलं आहे की, काही वर्षे तो या सगळ्यात पडणार नाहीये. तसं राकेशच्या प्रेमात कुणीही पडू शकतं, इतका तो क्यूट आहे. माझ्या अनेक मैत्रिणीसुद्धा म्हणतात, ‘हा तुझा भाऊ आहे? त्याला भाऊ म्हणावं लागतं’.”
नंतर शीतल यांना “राखी राकेशच्या प्रेमात पडेल का?” असं विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या, “राखी खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे, तिला माहितीय की राकेशने आधीच सांगून टाकलं आहे तर ती त्यात पडणार नाही, ती समंजस आहे. तिनेसुद्धा जग पाहिलं आहे, तिलासुद्धा तिच्या मर्यादा माहीत आहेत आणि राकेशनेही ते तिला स्पष्टपणे सांगितलंच आहे.”
