इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी ते इंडस्ट्रीत नवीन असताना त्यांना वाईट अनुभव आल्याचा, कास्टिंग काऊच सारख्या घटना घडल्याचा खुलासा मुलाखतींमधून केलेला आहे. असंच काहीसं ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ फेम रेवा कौरसेबरोबरही घडलं. रेवा अलीकडे ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेली. अशातच आता तिने तिला आलेल्या या विचित्र अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

अनेक कलाकारांसाठी रिअॅलिटी शो हा करिअरमधला महत्त्वाचा टप्पा ठरतो. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६मुळे रेवा कौरसेबरोबरही असंच घडलं मात्र, मनोरंजन क्षेत्रात यश एका रात्रीत मिळत नाही, असं तिचं म्हणणं आहे. शोमुळे कामाच्या संधी वाढतात, पण चांगलं आणि अर्थपूर्ण काम मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. असंही तिचं मत आहे आणि अनेकदा चांगल्या संधीच्या शोधात असातनाच त्यांना वाईट प्रसंगांचाही सामना करावा लागतो.

बिग बॉसबद्दल प्रतिक्रिया

‘बिग बॉस मराठी’बद्दल बोलताना रेवा म्हणाली की, या शोमुळे तिची लोकप्रियता नक्कीच वाढली. मात्र, अभिनय क्षेत्रातील अनिश्चितता मात्र तशीच कायम आहे. ती म्हणाली, “बिग बॉस हे खूप मोठं व्यासपीठ आणि एक मोठा ब्रँड आहे. त्यामुळे माझ्या करिअरमध्ये नक्कीच फरक पडला आहे, पण या शोमध्ये सहभागी होण्यापूर्वीही मी टेलिव्हिजनमध्ये काम करत होते. त्यावेळीही मालिकांच्या ऑफर्स येत होत्या. चित्रपटांच्या बाबतीतही सध्या बोलणं सुरू आहे आणि योग्य संधीची वाट पाहत आहे.”

मात्र, वाढत्या लोकप्रियतेमागे एक असा अनुभव दडलेला आहे, ज्याचा तिच्या करिअरवर आणि आत्मविश्वासावर खोल परिणाम झाला. आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण प्रसंगांपैकी एकाचा उल्लेख करताना रेवाने सांगितलं की, एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी विचारणा झाली असताना तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. चांगली संधी मिळत आहे असं वाटत असताना तिला हा अनुभव आला जो पुढे तिच्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा ठरला. या घटनेबद्दल सांगताना रेवा म्हणाली की, त्या चित्रपटासाठी तिला हैदराबादला बोलावण्यात आलं होतं. तिथे तिने सलग तीन दिवस लूक टेस्ट, कॅमेरा टेस्ट आणि वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला. हे सर्व अतिशय व्यावसायिक पद्धतीने पार पडल्यामुळे आपली त्या भूमिकेसाठी निवड झाली असल्याचा तिला पूर्ण विश्वास वाटू लागला होता.

रेवा म्हणाली, “मला हैदराबादला बोलावण्यात आलं होतं आणि सगळं काही अगदी व्यावसायिक पद्धतीने सुरू होतं. तीन दिवस माझ्या लूक टेस्ट, कॅमेरा ट्रायल्स आणि वर्कशॉप झाले. त्यामुळे मला खरंच वाटलं होतं की, माझी त्या चित्रपटासाठी निवड झाली आहे.” ती पुढे म्हणाली की, तिला साइनिंग अमाउंटही देण्यात आली होती आणि शुभ मुहूर्तावर अधिकृत करार केला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर अचानक चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिच्याशी संपर्क करणं बंद केल्याचा दावा तिने केला.

रेवाने सांगितला धक्कादायक प्रकार

रेवा याबद्दल म्हणाली, “मी शेवटी त्यांना याबाबत जाब विचारला, तेव्हा मला अप्रत्यक्षपणे सांगण्यात आलं की, निर्मात्यांपैकी एकाला माझ्याकडून वैयक्तिक स्वरूपाची अपेक्षा (फेवर्स) होती. हे ऐकून मला मोठा धक्का बसला. माझ्या करिअरची ती अगदी सुरुवातीची वेळ होती आणि कोणी अशी मागणी करू शकतं, यावरच माझा विश्वास बसत नव्हता.” यापुढे कोणतीही तडजोड करण्यास नकार देत रेवाने तत्काळ तो चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.

त्या प्रसंगाबद्दल बोलताना रेवा पुढे म्हणाली, “त्यानंतर मी त्या व्यक्तीशी पुन्हा कधीच बोलले नाही. जर अशाच प्रकारच्या अटी असतील, तर त्या सुरुवातीलाच स्पष्ट सांगायला हव्या होत्या. माझा वेळ वाया घालवण्याची गरज नव्हती.” या घटनेचा तिच्यावर मानसिकदृष्ट्या मोठा परिणाम झाला. हैदराबादमध्ये राहणंसुद्धा सुरक्षित वाटत नसल्याने तिने स्वतःच परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली. ती म्हणाली, “त्यांनी माझ्या परतीचं तिकीटही बुक केलं नव्हतं. त्यामुळे मी स्वतःच तिकीट काढलं आणि पुण्याला परत आले. माझ्याबरोबर नेमकं काय घडलं, हे मी माझ्या कुटुंबालाही सांगितलं नव्हतं, कारण तो अनुभव माझ्यासाठी खूपच वेदनादायी होता.”

घडलेल्या घटनेतून बाहेर यायला दोन महिने लागले

रेवा पुढे म्हणाली, “खरं सांगायचं तर, त्या धक्क्यातून सावरण्यासाठी मला बराच वेळ लागला. जवळपास दोन महिने मी कोणत्याही कामात सक्रिय नव्हते, कारण माझ्यासबरोबर नेमकं काय घडलं होतं, हेच मला स्वीकारता येत नव्हतं. मी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचं मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबीयांना आधीच सांगितलं होतं, पण अचानक कोणताही प्रोजेक्ट न करता परत यावं लागलं. माझ्या कुटुंबालाही नेमकं काय घडलं, हे सांगण्याचं धाडस माझ्यात नव्हतं.” तिने पुढे सांगितलं की, नंतर तिने हा सगळा प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. तिच्याशी बोलून मन मोकळं केल्यानंतरच हळूहळू तिला या धक्क्यातून सावरण्याचं आणि पुन्हा नव्याने पुढे जाण्याचं बळ मिळालं.

“मी पुन्हा कामाला सुरुवात केली आणि चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मला पुन्हा कधीही अशा प्रकारच्या अनुभवाला सामोरं जावं लागलं नाही.” असं रेवा म्हणाली. या घटनेनंतर तिचा कलाकृती निवडण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलला. आता कोणतंही काम स्वीकारण्यापूर्वी ती पूर्ण काळजी घेते. ती म्हणाली, “मी प्रोजेक्ट निवडताना नेहमीच खूप सावध असते. केवळ काम मिळतंय म्हणून कोणतंही काम करायचं नाही. मला योग्य आणि चांगल्या संधींचीच निवड करायची आहे.” सध्या रेवा विविध ऑडिशन्स देत असून, ओटीटी क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

रेवाची ओटीटीला पसंती

ती म्हणाली, “सध्या माझं प्राधान्य ओटीटी आणि चित्रपटांना आहे. कारण या माध्यमांमुळे कलाकारांना वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळते. टेलिव्हिजनमध्ये अनेकदा एकाच प्रकारची भूमिका वर्षानुवर्षे करावी लागते. आजचे प्रेक्षकही वास्तवाशी जवळीक असलेला आणि संबंधित वाटणारा आशय पाहण्यास अधिक पसंती देत आहेत. ओटीटीवर अशा प्रकारच्या आशयाला भरपूर वाव आहे. कलाकार म्हणून मला वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वतःवर प्रयोग करायचे आहेत. एकाच साच्यात अडकायचं नाही. त्यामुळे माझ्या करिअरच्या या टप्प्यावर माझा अधिक भर ओटीटी आणि चित्रपटांवर आहे.”