Bigg Boss Marathi 6 : गेली वर्षभर ज्या कार्यक्रमाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. त्या शोचा म्हणजेच ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला. यंदा रितेश देशमुखच्या उपस्थितीत एकूण १७ स्पर्धकांनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश घेतला. घरात एन्ट्री घेताना या स्पर्धकांना दोन पर्याय देण्यात आले होते. एक होतं ‘शॉर्टकट दार’ आणि दुसरं ‘मेहनतीचं दार’…१७ पैकी ६ स्पर्धकांनी शॉर्टकट दार निवडलंय. तर, अन्य स्पर्धकांनी मेहनतीचा मार्ग निवडलाय. आता या १७ सेलिब्रिटींना पहिल्याच दिवशी घरात कशाचा सामना करावा लागणार? याचा पहिला प्रोमो नुकताच ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात यंदा १७ सेलिब्रिटींबरोबर शंभर दिवसांचा खेळ रंगणार आहे. पण, या सगळ्यांना पहिल्याच दिवशी एका जबरदस्त टास्कचा सामना करावा लागणार आहे. यंदाची थीम आहे ‘दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार…’. घरातील विविध दारं कधीही, कुठेही उघडतील आणि स्पर्धकांना क्षणोक्षणी धक्का मिळेल अशी हिंट आधीच रितेश भाऊंनी सर्वांना देऊन ठेवली होती. पण, पहिल्याच दिवशी या स्पर्धकांनी ‘बिग बॉस’चा एक आदेश ऐकला नाहीये आणि म्हणून त्यांना शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi 6 : पहिल्या दिवशी नेमकं काय घडलंय?

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्याच दिवशी तुफान येणार आहे. मुख्यप्रवेशद्वाराजवळ एक बझर ठेवण्यात आल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. पण, हा बझर एकाही स्पर्धकाने वाजवला नाही. त्यामुळे वेळेची मर्यादा संपल्यावर बिग बॉस म्हणतात, “कोणीच बझर वाजवून तुफान थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे घर तुम्हा सर्वांसाठी बंद होतंय.”

‘बिग बॉस’ने पहिल्याच दिवशी घर बंद केलं आहे. सगळे स्पर्धक यावेळी गार्डन एरियामध्ये उपस्थित असतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर घर बंद केलं जातं. लिव्हिंग एरियातील फ्लॅप्स क्लोज होत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय.

आता पहिल्याच दिवशी घर बंद झाल्यावर स्पर्धक काय करणार? घर बंद केल्यावर ‘बिग बॉस’चा पुढील ट्विस्ट काय असेल याचा उलगडा एपिसोड ऑन एअर झाल्यावर होईल.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ६’ हा शो प्रेक्षकांना रोज रात्री ८ वाजता ‘कलर्स मराठी’ आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहता येणार आहे.