Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची सांगता १९ एप्रिलला झाली. यंदा महाअंतिम सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला. अभिनेत्री तन्वी कोलतेने यावर्षी ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. ग्रँड फिनालेला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या प्रमोशननिमित्त अभिषेक बच्चन आणि जिनिलीया देशमुख सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याशिवाय दरवर्षीप्रमाणे सहाव्या सीझनमध्ये सहभागी झालेले एक्स सदस्य सुद्धा महाअंतिम सोहळ्यात उपस्थित होते.
राखी सावंत, राधा, आयुष संजीव, सचिन कुमावत यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी प्रत्येकाची मनं जिंकून घेतली. मात्र, या सोहळ्यात काही सदस्य गैरहजर सुद्धा होते. हे अनुपस्थित राहिलेले चार जण नेमके कोण आहेत जाणून घेऊयात…
प्राजक्ता शुक्रे, सोनाली राऊत, रुचिता जामदार, संकेत पाठक हे चार जण ग्रँड फिनालेला गैरहजर होते. यापैकी प्राजक्ता शुक्रेने ती ग्रँड फिनालेला उपस्थित का नाही राहिली याचं कारण सांगितलं आहे.
प्राजक्ता म्हणाली, “तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिलं…यासाठी तुमचे खूप-खूप आभार! ‘बिग बॉस मराठी’च्या संपूर्ण टीमचे आभार कारण, या शोमुळे मी आज घराघरांत पोहोचले…माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. हा प्रवास खूप सुंदर होता..मला अनेक गोष्टी यामुळे शिकता आल्या. ग्रँड फिनालेला मी येऊ शकले नाही कारण, माझ्या कामाच्या काही कमिटमेंट्स होत्या. पण, मी सर्वांना खूप जास्त मिस करणार आहे.”
प्राजक्ता शुक्रेने व्हिडीओ शेअर करत ग्रँड फिनालेला उपस्थित न राहण्याचं कारण स्पष्ट केलं. मात्र, सोनाली राऊत, रुचिता जामदार, संकेत पाठक यांनी याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
खरंतर, रुचिता जामदारने सहावा सीझन पहिल्या दिवसापासून गाजवला होता. रुचिता आणि विशालची टोळी सर्वत्र तुफान चर्चेत होती. पण, तिनेही ग्रँड फिनालेला येणं टाळलं. रुचिताचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद असल्यामुळे ती फिनालेला का आली नाही याची कोणतीही अपडेट समोर आलेली नाहीये.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन तन्वी कोलतेने जिंकला आहे. तर, राकेश बापट यावर्षी रनर अप ठरला आहे. विशाल तिसऱ्या क्रमांकावर, अनुश्री माने चौथ्या स्थानी आणि दिपाली सय्यद पाचव्या स्थानी एलिमिनेट झाल्याचं पाहायला मिळालं.
