Bigg Boss Marathi 6 Finali Riteish And Genelia Deshmukh Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा महाअंतिम सोहळा आज १९ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला यावर्षी दोन खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. हे दोन पाहुणे आहेत… बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री-निर्माती जिनिलीया देशमुख. हे दोघंही आगामी ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या प्रमोशननिमित्त ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

आपल्या जवळच्या मित्राला आणि पत्नीला ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर आलेलं पाहताच रितेशचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जिनिलीया देशमुखने एकदम मराठमोळ्या अंदाजात या शोमध्ये उपस्थिती लावली होती. निळ्या रंगाची इरकल साडी, मराठमोळे पारंपरिक दागिने, केसात गजरा या लूकमध्ये जिनिलीया खूपच सुंदर दिसतेय.

पत्नी रंगमंचावर येताच रितेश सर्वप्रथम तिचं स्वागत केलं. यानंतर जिनिलीयाने उपस्थित स्पर्धकांशी संवाद साधला. यावेळी शोमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झालेली संस्कृती साळुंके जिनिलीयाला प्रश्न विचारत म्हणाली, “घरी असा कोणता धक्का पार पडतो का? आणि तिकडे होस्ट कोण असतं?”

यावेळी जिनिलीया हसत-हसत म्हणाली, “आमच्या घरी फक्त वहिनीचा धक्का असतो. अहो बरोबर ना?”

पत्नीचं हे उत्तर ऐकून रितेश सुद्धा काहीसा लाजला. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

riteish deshmukh genelia
जिनिलीया देशमुख व रितेश देशमुख ( Genelia And Riteish )

दरम्यान, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

यामध्ये रितेश देशमुखसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच ‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख यांनी केली आहे.