Bigg Boss Marathi 6 Colors Marathi Promo: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या ११ जानेवारीला शोचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडेल. दरवर्षी ‘बिग बॉस’ सुरू होण्यापूर्वी घरात कोण प्रवेश घेणार? याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली असते. घरात एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध सेलिब्रिटींची, रीलस्टार्सची नावं चर्चेत आहेत. मात्र, सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबाबतची कोणतीही अपडेट ‘कलर्स मराठी’ने अधिकृतरित्या शेअर केली नव्हती.

आता शो सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस बाकी राहिलेले असताना ‘कलर्स मराठी’कडून ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धकाची झलक शेअर करण्यात आली आहे.

यंदा घरात एक सुपर मॉडेल एन्ट्री घेणार आहे. “फॅशनच्या जगातील ही सुंदरी, भल्याभल्यांवर पडणार भारी…ओळखा पाहू कोण?” असं कॅप्शन कलर्स वाहिनीने या पोस्टला दिलं आहे. यामध्ये साडी नेसून तयार झालेल्या एका अभिनेत्रीची झलक पाहायला मिळतेय. मात्र, तिचा चेहरा अद्याप रिव्हिल करण्यात आलेला नाहीये.

‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका नेटकऱ्याने यावर, “ही प्रसिद्ध युट्यूबर व अभिनेत्री उर्मिला निंबाळकर आहे का?” असा प्रश्न विचारला आहे. तर, दुसऱ्या एका नेटकऱ्याने, ही सुपर मॉडेल सोनाली राऊत असल्याचा अंदाज कमेंट्समध्ये वर्तवला आहे. सोनाली राऊत यावर्षी शोमध्ये सहभागी होणार अशा चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र सुरू आहेत.

तर, अन्य काही युजर्सनी, “हे फक्त AI ने तयार केलेलं रील आहे, त्यामुळे इतक्यात समजणार नाही ही नेमकी कोण आहे” असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेणारी ही सुपर मॉडेल नेमकी कोण आहे याचा उलगडा ११ जानेवारीला रात्री ८ वाजता होणार आहे. यंदा एकूण १६ हून अधिक स्पर्धक घरात एन्ट्री घेणार आहेत. ११ जानेवारीला रितेश देशमुख अधिकृतरित्या यांची नावं जाहीर करणार आहे.

दरम्यान, यंदाही विविध क्षेत्रातील अतरंगी स्पर्धक एका छताखाली राहणार आहेत. यंदाच्या सीझनची सर्वात मोठी खासियत म्हणजे घराची आगळीवेगळी संकल्पना. यावर्षी १३,००० चौरस फूट भव्य जागेत विविध क्षेत्रातील १६ हून अधिक लोकप्रिय सेलिब्रिटी सदस्य म्हणून या घरात एन्ट्री घेणार आहेत. प्रत्येक दारामागे एखादं आव्हान, एखादा धक्का किंवा एखाद्याचं नशीब बदलणारा क्षण दडलेला असेल. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ही केवळ टॅगलाईन नसून यंदाच्या सीझनचं मुख्य वैशिष्ट्य आहे.