Bigg Boss Marathi 6 Promo: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. घरात नुकतंच चौथ्या आठवड्याचं नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे. चौथ्या आठवड्यात घरातील एकूण नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता आजच्या भागात घरात कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे.

या टास्कचं नाव आहे ‘बीबी पापड फॅक्टरी’. या टास्कमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकांना या आठवड्याची कॅप्टन्सी उमेदवारी मिळणार आहे. घराचा कॅप्टन झाल्यावर नॉमिनेशनपासून सुटका होते. त्यामुळे सध्याच्या घडीला घरातील प्रत्येक सदस्याला कॅप्टन व्हायचंय. त्यामुळे या टास्कमध्ये घरात मोठा राडा होणार आहे.

करण आणि रुचिता यांच्यात पहिल्या दिवसापासून वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. करणने रुचिताची ‘पॉवर Key’ देण्यास नकार दिल्यापासून यांच्यात वारंवार खटके उडाले उडाले आहेत. पण, या दोघांचं भांडण आता टोकाला पोहोचणार आहे.

‘बीबी पापड फॅक्टरी’ या टास्कमध्ये रुचिता-करण यांच्या जोरदार भांडण होणार आहे. इतकंच नव्हे तर समोर आलेल्या प्रोमोमध्ये रुचिता करणच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

रुचिताला करण रागात म्हणतो, “ए मारते काय? देऊ काय?” या दोघांचं भांडण पाहून विशाल पटकन मध्यस्थी करण्यासाठी पुढे येतो. यावेळी करण चिडून म्हणतो, “विशाल तिने मारलंय मला” अर्थात रुचिताने मला मारलंय असा दावा करणने केलेला आहे. आता खरंच करणला रुचिताने मारहाण केली असेल तर हा घरातील सगळ्यात मोठा नियमभंग आहे.

करण-रुचिताच्या वादाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “रुचिताने करण मारलंय वाटतं बाहेर काढा तिला”, “रुचिताला आधी बाहेर काढा खूप रडकी आहे ती”, “करण भाऊ आता या रुचिताला सुट्टी देऊ नकोस”, “आर्याने निक्कीला जेव्हा मारलं होतं..तेव्हा आर्याला बाहेर काढण्यात आलं होतं आता रुचिता चुकीची असेल तर तिलाही बाहेर काढलं पाहिजे”, “करणला फुल सपोर्ट आहे” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, आता खरंच करण व रुचिता या दोघांमध्ये नेमकं काय घडलंय? हे आज ( ३ फेब्रुवारी ) प्रसारित होणाऱ्या भागात स्पष्ट होईल.