Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. रेवा कौरासेच्या मिडवीक एव्हिक्शननंतर आता या शोला यंदाचे टॉप-५ फायनलिस्ट भेटले आहेत. मात्र, सध्या प्रेक्षक तन्वी कोलतेवर प्रचंड नाराज झाले आहेत. रेवा घराबाहेर जाताना तन्वीने “खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली आणि चांगल्या मनाची पोरगी बाहेर गेली” असं वक्तव्य केलं. शेवटच्या क्षणी तन्वीचं असं वागणं प्रत्येकाला खटकलं.

शो संपायला अवघे काही दिवस बाकी राहिले असताना अशा पद्धतीने एखाद्याचा अपमान करणं चुकीचं आहे. अनुश्री आणि विशाल सुद्धा खूप मेहनतीने या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत अशा बऱ्याच प्रतिक्रिया सध्या तन्वीविरोधात सोशल मीडियावर उमटत आहेत. याबाबत ‘बिग बॉस मराठी ४’चे फायनलिस्ट आणि प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी देखील पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहे.

किरण मानेंनी त्यांच्या सीझनची आठवण सांगत तन्वीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ट्रॉफी जिंकली नाही तरी अनुश्री-विशालने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

किरण माने यांची पोस्ट….

यावेळी टॉप फाइव्ह जाहीर झाल्यावर अख्ख्या घरात तन्वीने जो ‘मातम’ घातला त्यामुळे हा दिवस आठवला… आमच्या सीझनला ‘टॉप फाइव्ह’मध्ये आल्यावर तो क्षण आम्ही पाचही जणांनी फुल एन्जॉय केला.

अपूर्वा नेमळेकर ९८ दिवस माझी कट्टर विरोधक होती. सगळ्यात भयानक वाद आमचे झाले होते…पण पहिला फायनलिस्ट म्हणून माझं नाव जाहीर झाल्यानंतर तिनं टाळ्या वाजवत मिठी मारून माझं अभिनंदन केलं होतं. अक्षय-अमृतानं सुद्धा सगळी कटुता विसरून हातात हात घेतला होता. राखी तर घट्ट मैत्रीणच होती. तिला फुल्ल कॉन्फिडन्स होता की मी फायनलिस्ट असणार. प्रतिस्पर्धी असला तरी त्याच्या अचिव्हमेंटचा आदर करणं हे आपलं मन मोठं असल्याचं लक्षण असतं.

आता या सीझनला टॉप-५ जाहीर झाल्यावर तन्वीने जो अत्यंत गलिच्छ राडा घातला, तो पाहून विशाल-अनुश्रीसाठी वाईट वाटलं. दिपाली राकेश साठीही… बिचाऱ्यांना तो क्षण तन्वीने पुरेसा साजराही करू दिला नाही. काय मानसिकता असेल ही? खूप-खूप-खूप-खूप कष्ट आणि मानसिक शारीरिक सामर्थ्याची सीमा पार करून लोक इथवर पोहोचलेले असतात. अशावेळी प्रतिस्पर्ध्याच्याही मेहनतीचा आदर ठेवायला आपण चांगलं ‘माणूस’ असावं लागतं. खिलाडूवृत्ती असावी लागते. सीझनभर विशालला अहंकारी म्हणणारी तन्वी शेवटी अहंकारी निघाली. अहंकारी असता तर विशाल राकेशला स्वतःहून सॉरी म्हणाला नसता. सगळ्यांनी सीझनभर अनुश्रीचे संस्कार काढले… शेवटी तन्वीने एवढ्या शिव्या देऊन, अपमान करूनही अनुश्रीने तन्वीला साखर भरवली… हे खरे संस्कार. म्हणून मी म्हणतो अनुश्री-विशाल तुम्ही मनं जिंकली! सर्वांची मनं जिंकणं महत्वाचं… बाकी ट्रॉफी वगैरे फार मॅटर करत नाही.

दरम्यान, किरण मानेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील सहमती दर्शवली आहे. येत्या १९ एप्रिलला ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा फिनाले पार पडणार आहे. आता या पाच जणांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.