Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी राधा पाटील विरुद्ध दिपाली सय्यद असा वाद पाहायला मिळणार आहे. दिपाली सय्यदने गेली अनेक वर्षे त्यांच्या लावणी नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. यासह अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिने परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. दिपालीकडे नवोदित नृत्यांगना आदर्श म्हणून पाहतात.

तर, दुसरीकडे राधाला गौतमी पाटीलबरोबर झालेल्या वादामुळे महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली आहे. अगदी ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री घेताना सुद्धा राधाने मी कोणालाच घाबरत नाही गौतमी पाटीलला सुद्धा नाही असं म्हटलं होतं. यांना त्यांच्या डान्समुळे अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. बिग बॉसच्या घरात सुद्धा दिपालीने याच संदर्भात भाष्य केलं आहे.

“लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतात…त्याला Cheap करून टाकलं. बार डान्सर… ते तुम्ही स्टेजवर घेऊन येता” असं दिपाली बिग बॉसच्या घरात चर्चा करताना म्हणाली. तिचं हे मत ऐकून राधा दुखावली गेली आणि मी सुद्धा लायकी काढू शकते असं ती दिपालीच्या अपरोक्ष म्हणाली. यावर आता सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“राजकारणी vs लावणीकलाकार चालूदे”, “दिपाली ताईंचं १०० टक्के खरं आहे”, “काय चुकीचं बोलल्या दिपाली मॅम”, “दिपाली ताई फायर आहेत”, “काय खोटं बोलल्या दिपाली मॅम? लावणी म्हणजे फक्त नृत्य नाही”, “ती महाराष्ट्राच्या मातीचा श्वास आहे…”, “आधी अश्लील हावभाव करून प्रसिद्धी मिळवायची आणि एकदा प्रसिद्धी मिळाली की चांगूलपणा दाखवायचा. दिपाली ताई या स्वतः लावणी शोच्या जज होत्या.. त्यांना त्यातील बारकावे आणि संस्कृती माहीत आहे”, “महाराष्ट्राची जनता बोलत होती तेव्हा तुला रडू नाही आलं, दिपाली सय्यद बोलल्या की तुला रडू आलं” अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.

bb marathi 6
नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Bigg Boss Marathi 6 )

दरम्यान, आता दिपाली आणि राधा यांच्यातील वाद कुठलं वळण घेणार? घरातील अन्य सदस्य या भांडणात कुणाची बाजू घेणार हे आजच्या भागात स्पष्ट होईल. हा शो रोज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित केला जातो.