Megha Dhade And Pushkar Jog Entry: बिग बॉस हा असा रिॲलिटी शो आहे, ज्यामध्ये दरवर्षी अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. अभिनयासह विविध क्षेत्रांतील नामांकित तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय ठरलेले अनेकजण बिग बॉससारख्या शोमध्ये दिसतात.
‘बिग बॉस’ हा शो फक्त हिंदीमध्ये प्रदर्शित होत नाही, तर कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि मराठी या भाषांमधूनदेखील तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.
सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता शेवटच्या टप्प्यात आला असून वाईल्ड कार्डसह या पर्वात २१ जण सहभागी झाले होते. त्यापैकी पाचजण आता अंतिम फेरीत पोहोचले आहेत. राकेश बापट, अनुश्री माने, तन्वी कोलते, विशाल कोटियन आणि दीपाली सय्यद हे पाच स्पर्धक आता घरात उरले आहेत. बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार अशी उत्सुकता प्रेक्षकांना तर आहेच, पण त्याचबरोबर बिग बॉस मराठीचा एक प्रोमो लक्ष वेधून घेत आहे.
कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत अशा दोन व्यक्ती पाहायला मिळत आहेत, ज्यांनी याआधीच्या सीझनमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या दोन व्यक्ती म्हणजे मेघा धाडे आणि पुष्कर जोग होय.
मेघा धाडे आणि पुष्कर जोगची बिग बॉस मराठी ६ मध्ये एन्ट्री
बिग बॉसच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, बिग बॉस घोषणा करतात की घरात येणार आहेत सीझन एकमधील धुरंधर. त्यानंतर बिग बॉसच्या घरात मेघा धाडे व पुष्कर जोग यांची एन्ट्री होते. स्पर्धक त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात. पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात आल्यानंतर मेघा आणि पुष्करला आनंद झाल्याचे पाहायला मिळते. पुढे ते दोघे स्पर्धकांबरोबर मजेशीर टास्क खेळतात. त्यानंतर काही स्पर्धक आनंदात जिंकलो, असे म्हणताना दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “बिग बॉसच्या घरात होणार सीझन वनच्या धुरंधर स्पर्धकांची एन्ट्री…
मेघा धाडे आणि पुष्कर जोग येणार, घरात मजा मस्ती धमाल रंगणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
मेघा धाडे आणि पुष्कर जोग बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या दोघांनीही त्यांच्या खेळाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. त्यांची भांडणे, मतभेद, मैत्री, टास्कदरम्यानचा परफॉर्मन्स या सगळ्यांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजही प्रेक्षक त्यांची वेळोवेळी आठवण काढत असल्याचे पाहायला मिळते. मेघा पहिल्या सीझनची विजेती ठरली होती, तर पुष्करला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.
पुष्कर जोगने व्यक्त केली कृतज्ञता
पुष्कर जोगने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बिग बॉसच्या सेटवर गेल्याचे दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये मेघा धाडेची झलकदेखील दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी शिव ठाकरेबरोबरदेखील फोटो पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
पुष्करने लिहिले, “ज्या घराने मला सर्वकाही परत मिळवून दिले, त्या घरात जाण्याचा आनंद. या घरात एक जादू आहे, यासाठी कलर्स मराठी आणि बिग बॉसचा मी कायम ऋणी राहीन.” पुढे त्याने बिग बॉसच्या टीममधील काहींना टॅग करत त्यांचे आभार मानले आहेत. पुष्करच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला व मेघाला पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये पाहून आनंद व्यक्त केल्याचे लिहिले.
नेटकरी म्हणाले…
“पुष्कर दादा आणी मेघा ताई.. दोघे एकत्र म्हटल्यानंतर धमाल तर होणारच”, “बिग बॉस मराठीचा पहिला सीझन सगळ्यात बेस्ट होता”, “पुष्कर मी तुला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी उत्सुक आहे”, “तुम्हा दोघांना एकत्र पाहिल्यानंतर आठवणी जाग्या झाल्या”, अशा अनेक कमेंट या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आता बिग बॉस मराठी ६ मध्ये आणखी कोणते कलाकार, याआधीच्या सीझनमधील स्पर्धक येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
