Bigg Boss Marathi 6 Mid-Week Eviction : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. १९ एप्रिलला या शोचा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर राखी सावंतचं एलिमिनेशन झालं होतं. यानंतर घरात एकूण सहा स्पर्धक राहिले. त्यामुळे या आठवड्यात फिनालेपूर्वी शोमध्ये Mid-Week एव्हिक्शन होऊ शकतं, असा अंदाज प्रत्येकाला होता. प्रेक्षकांचा हा अंदाज आता खरा ठरला आहे. फिनालेपूर्वी शोमधून एका सदस्याची एक्झिट झाली असून, आता यंदाचे टॉप-५ स्पर्धक कोण आहेत…त्यांची नावं जाहीर झालेली आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात शेवटच्या एलिमिनेशनसाठी एक हटके टास्क डिझाइन करण्यात आला होता. एका बोर्डवर एकूण उभ्या सात चौकटी होत्या. यामध्ये काही किल्ल्या ठेवण्यात आल्या होत्या. यात किल्ल्यांच्या बाजूला असलेल्या क्यू कार्ड्सवर स्पर्धकांसाठी विविध मेसेज लिहून ठेवण्यात आले होते. या खेळात सर्वात आधी सेफ झाला राकेश बापट.

राकेश बापट यंदाच्या पर्वाचा दुसरा फायनलिस्ट ठरला आहे. तर, तन्वीने ‘तिकीट टू फिनाले’ जिंकल्यामुळे ती या एव्हिक्शनपासून आधीच सेफ होती. यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची तिसरी फायनलिस्ट ठरली आहे अनुश्री माने आणि चौथ्या क्रमांकावर आहे विशाल कोटीयन.

विशाल सेफ झाल्यावर आता ‘काटा ग्रुप’पैकी कोणीतरी या घराचा निरोप घेणार ही गोष्ट स्पष्ट झाली होती. त्यामुळे तन्वीला अश्रू अनावर झाले होते. आता शेवटी दिपाली आणि रेवा या दोघी डेंजर झोनमध्ये होत्या. यांच्यापैकी रेवा घराबाहेर जाईल असं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं.

BB Marathi 6 : टॉप-५ फायनलिस्ट कोण?

आता रेवाच्या एव्हिक्शननंतर यंदाचे पाच फायनलिस्ट ठरले आहेत. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद हे यंदाचे पाच फायनलिस्ट आहेत. आता या पाच जणांपैकी बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकाला जर प्रेक्षकांना व्होट करायचं असेल तर व्होटिंग लाइन्स या १८ एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. प्रेक्षक JioHotstar वर सुद्धा व्होट करू शकतात.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ६’चा महाअंतिम सोहळा १९ एप्रिलला रात्री ८ वाजता ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.