Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच राकेश बापट व अनुश्री माने यांच्यात टोकाचा वाद झाल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. राकेशने माझा हात खेचला, मला परवानगीशिवाय कोणीही हात लावू शकत नाही असं वक्तव्य अनुश्रीने ‘बिग बॉस’च्या घरात केलं. खरंतर, अनुश्रीच राकेशच्या बेडवर जाऊन झोपली होती. प्रकृती ठिक नसल्याने, ‘तू लवकर इथून उठ आणि दुसरीकडे जाऊन झोप’ अशी विनंती राकेश तिला करत होता. इतकंच नव्हे तर सगळ्यात आधी राकेशने प्राजक्ता शुक्रे, दिपाली सय्यद, तन्वी कोलते या मुलींना अनुश्रीला उठवा आणि तिच्या जागेवर पाठवा असं सांगितलं होतं. तरीही ती काही केल्या ऐकली नाही.

अनुश्रीने दुसऱ्या दिवशी केलेले आरोप ऐकून राकेश प्रचंड दुखावला गेला होता. रुचिता आणि अनुश्री या दोघींशीही सध्या तो बोलत नाहीये. यादरम्यान, सागर कारंडे, दिपाली सय्यद, आयुष संजीव या सदस्यांनी अनुश्रीची चांगलीच कानउघडणी केली. याशिवाय या प्रकरणावर आता सोशल मीडियावर देखील तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राकेशच्या चाहत्यांनी #WeSupportRaqeshBapat हा हॅशटॅग ट्रेंड करत अभिनेत्याला पाठिंबा दिला आहे. याशिवाय मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी सुद्धा राकेशच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री सोनाली पाटीलने सविस्तर व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर आता रितेश भाऊंनी अनुश्रीला चांगलाच जाब विचारला पाहिजे अशी मागणी केली आहे. सोनालीसह ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाची उपविजेती नेहा शितोळेने सुद्धा पोस्ट शेअर करत या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

नेहा शितोळेची पोस्ट

नेहा शितोळे राकेशबद्दल लिहिते, “राकेश बापट…याप्रकरणात मी तुझ्याबरोबर आहे, माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. या मुली अतिशय वाईट पद्धतीने हा खेळ खेळत आहेत. एक स्त्री म्हणून मी तुझी माफी मागते…हे अजिबातच योग्य नाहीये. खरंच चुकीचं आहे! #We Support Raqesh Bapat…RB खरंच जेंटलमन आहे.”

bb marathi 6
नेहा शितोळेची पोस्ट ( Bigg Boss Marathi )

दरम्यान, आता अनुश्री व रुचिता जामदार या दोघींना भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख काय बोलणार? या दोघीजणी राकेशची माफी मागणार का? हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतुर झाला आहे.