Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होऊन आता ३ आठवडे उलटले आहेत. आता चौथ्या आठवड्यात घरात कोणता नवीन ड्रामा पाहायला मिळणार? याबद्दल सगळेजण उत्सुक होते. सध्या घरात एकूण १५ स्पर्धक आहेत. या सगळ्यांना ‘बिग बॉस’ चौथ्या आठवड्यात जोडीच्या बेडीत अडकवणार आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या या पूर्वीच्या सीझनमध्ये सुद्धा प्रेक्षकांना हा हटके टास्क पाहायला मिळाला होता. ‘बिग बॉस’कडून नेहमी अनपेक्षित जोड्या जुळवल्या जातात. सतत भांडणाऱ्या स्पर्धकांना जोडीच्या बेडीत अडकवलं जातं, या सीझनमध्ये सुद्धा असंच काहीसं पाहायला मिळणार आहे.

राकेश बापट व अनुश्री माने यांच्यात गेल्या तीन आठवड्यांमध्ये किती भांडणं झालीयेत हे आपण सर्वांनीच पाहिलंय. पण, ‘बिग बॉस’च्या नव्या टास्कमुळे राकेश बापट व अनुश्री माने जोडीच्या बेडीत अडकले आहेत. याशिवाय दुसरी जोडी आहे तन्वी कोलते अन् रुचिता जामदार. या दोघी आधी मैत्रिणी होत्या पण, आता सतत एकमेकींशी वाद घालत असतात. आता या दोघी जोडीच्या बेडीत अडकल्यावर काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

घरात एकूण १५ सदस्य असल्याने आता एकूण ६ जोड्या आणि एक त्रिकुट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सचिन कुमावत, आयुष संजीव आणि करण यांना ‘बिग बॉस’ने त्रिकुटाच्या बेडीत अडकवलंय असं प्रोमोतून पाहायला मिळत आहे.

बिग बॉस सांगतात, “गेले तीन आठवडे आपणा सर्वांना कसलंच बंधन नव्हतं. पण, आता बिग बॉस तुम्हाला या क्षणापासून जोड्यांमध्ये अडकवत आहे.”

Bigg Boss Marathi 6 – चौथ्या आठवड्यात ‘या’ असतील जोड्या

  • करण सोनावणे, आयुष संजीव, सचिन कुमावत
  • तन्वी कोलते, रुचिता जामदार
  • प्राजक्ता शुक्रे, रोशन भजनकर
  • राकेश बापट, अनुश्री माने
  • सागर कारंडे, प्रभू शेळके
  • विशाल कोटियन, ओमकार राऊत
  • दिपाली सय्यद, दिव्या शिंदे

दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “दरवेळी ही थीम संपूर्ण गेम बदलते”, “अनुश्री राकेश एकत्र आता खरी मजा येईल”, “मस्तच जोड्या बनवल्या आहेत खरंच मजा येणार आहे”, “सगळे एकमेकांविरोधात बोलणारे एकत्र आले आहेत” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.