Bigg Boss Marathi 6 Nomination Task : ‘बिग बॉस’च्या घरात सातव्या आठवड्यात तन्वी कोलते सध्या घराची कॅप्टन असल्याने ती आधीच नॉमिनेशन प्रक्रियेपासून सेफ आहे. याशिवाय गेल्या आठड्यात दोन सदस्यांना ‘Power Key’ मिळाली होती. प्राजक्ता शुक्रे आणि अनुश्री माने…पण, यापैकी प्राजक्ताची ‘Power Key’ प्रभूने मोठ्या हुशारीने चोरल्यामुळे तिला मिळणाऱ्या सगळ्या पॉवर्स आता प्रभूला लागू झाल्या आहेत.
‘बिग बॉस’ने सोमवारच्या भागात प्राजक्ता आणि अनुश्री या दोघींना ‘Power Key’ महाद्वारात जमा करण्यास सांगितलं. यावेळी अनुश्रीने तिची चावी जमा केली पण, प्राजक्ताची ‘Power Key’ हरवल्यामुळे ती बिग बॉसच्या आदेशाचं पालन करू शकली नाही. तिच्या ऐवजी प्रभूने ही ‘Power Key’ महाद्वारात जमा केली; यामुळेच प्राजक्ताच्या सगळ्या पॉवर्स आता प्रभूला मिळाल्या आहेत.
‘बिग बॉस’ने यानंतर घोषणा करत प्रभू आणि अनुश्री या दोघांना या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेपासून सेफ केलं आहे. याचाच अर्थ आता घरातील तन्वी, अनुश्री आणि प्रभू हे ३ सदस्य सुरक्षित आहेत.
आता उर्वरित सदस्यांना आजच्या भागात नॉमिनेशन टास्क खेळायचा आहे. या टास्कमध्ये रुचिता टोळीच्या विरोधात निर्णय घेऊन खेळताना दिसेल. प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसतंय त्याप्रमाणे रुचिताच्या गळ्यात राकेशचा फोटो आहे तर, दिपालीच्या गळ्यात रुचिताचा. राकेश व दिपाली यांची पहिल्यापासून चांगली मैत्री आहे. यामुळेच रुचिता आणि दिपालीची डील झालेली आहे.
रुचिता राकेशला नॉमिनेट का करत नाहीये याबद्दल विशाल तिला जाब विचारतो. पण, रुचिता स्वत:ला सेफ करण्यासाठी ( कारण रुचिताचा फोटो दिपालीच्या गळ्यात आहे ) या कार्यात अजिबात सहभागी होत नाहीये. यानंतर प्राजक्ता, सागर, विशाल सगळेजण रुचिताला “तू दिलेला शब्द मोडतेयस” याबाबत टोमणे मारतात.
पण, रुचिता स्पष्टपणे सांगते, “मला या क्षणाला टोळी-काटा ग्रुप वगैरे काहीच फरक पडत नाहीये. मी स्वत:साठीच खेळणार”
कोणाच्या गळ्यात कोणाचा फोटो आहे?
सागर – दिपालीचा फोटो
राकेश – रोशनचा फोटो
रुचिता – राकेशचा फोटो
दिपाली – रुचिताचा फोटो
विशाल – सागरचा फोटो
प्राजक्ता – विशालचा फोटो
राखी – प्राजक्ताचा फोटो
रोशन – राखीचा फोटो
दरम्यान, आता या सातव्या आठवड्यात घरातून कोण नॉमिनेट होणार? या आठवड्यात कोणाच्या डोक्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार हे आजच्या भागात स्पष्ट होईल.
