Bigg Boss Marathi 6 Nominated Contestant List : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच सातव्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क पार पडला. तन्वी कोलते घराची कॅप्टन असल्याने ती या नॉमिनेशन प्रक्रियेपासून सुरक्षित होती आणि तिला ‘बिग बॉस’कडून एका सदस्याला थेट नॉमिनेट करण्याची विशेष पॉवर सुद्धा मिळाली होती. तर, प्रभू आणि अनुश्री या दोघांकडे ‘पॉवर Key’ असल्याने हे दोघंही या टास्कमध्ये सुरक्षित होते.

‘नॉमिनेशनचा लगाम’ या टास्कमध्ये घरातील प्रत्येक सदस्याच्या गळ्यात आपल्या सहस्पर्धकाचे फोटो होते. उदाहरणार्थ, राकेशच्या गळ्यात रोशनचा फोटो होता. तर रोशनच्या गळ्यात राखी सावंतचा फोटो होता. त्यामुळे स्पर्धकांना एकमेकांशी डील करून या टास्कमध्ये स्वत:ला सुरक्षित करायचं होतं.

बझर वाजल्यावर सर्वात आधी राकेशने रोशनला नॉमिनेट केलं. यानंतर, दुसऱ्या फेरीत खेळाच्या निकषांनुसार रुचिताने राकेश बापटला नॉमिनेट केलं. तर, तिसऱ्या फेरीत एक अजब प्रकार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या फेरीत राखी सावंत प्राजक्ताला सुरक्षित करण्यासाठी स्वत: नॉमिनेट झाली आणि तिने प्राजक्ताला सेफ केलं.

शेवटी एका सदस्याला थेट नॉमिनेट करण्याची पॉवर ‘बिग बॉस’ने घराची कॅप्टन असलेल्या तन्वीला दिली. या पॉवरनुसार तन्वीने प्राजक्ता शुक्रेला थेट नॉमिनेट केलं. यामुळेच सातव्या आठवड्यात रोशन भजनकर, राकेश बापट, राखी सावंत आणि प्राजक्ता शुक्रे हे घरातील फक्त चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.

‘बिग बॉस’च्या घरातून फक्त चार सदस्य नॉमिनेट झाल्याने यावेळी व्होटिंगमध्ये तगडी स्पर्धा निर्माण होणार असल्याचा अंदाज आधीच प्रेक्षकांनी बांधला आहे. याशिवाय राखी जर या खेळात विशेष पाहुणी म्हणून सहभागी झाली असेल तर तिचा १५ दिवसांचा करार संपलाय आणि ती बाहेर येईल. नाहीतर प्राजक्ता घराबाहेर होईल असा अंदाज प्रेक्षकांनी वर्तवला आहे.

“राखी सावंतमुळे हा शो आम्ही आता रोज पाहतो”, “Only व्होट फॉर राखी”, “राखी सावंतला सगळ्यांनी सपोर्ट करा”, “आपली राखी सेफ झाली पाहिजे”, “राखीचे १५ दिवस पूर्ण झालेत… ती आता बाहेर नाही ना होणार?” अशा असंख्य कमेंट्स बिग बॉसने शेअर केलेल्या पोस्टवर आल्या आहेत.

दरम्यान, आता प्राजक्ता, राखी, रोशन आणि राकेश या चार जणांपैकी घरातील प्रवास कोणाचा संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कमी व्होट्स मिळालेल्या सदस्याचं नाव जाहीर करेल. या व्होटिंग लाइन्स शुक्रवार २७ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत खुल्या असतील.