Deepali sayed and Raqesh Bapats friendship will break: ‘तुम बिन’, ‘कोई मेरे दिल में है’, ‘वृदांवन’, अशा काही चित्रपटांतून राकेश बापटने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच, ‘मर्यादा: लेकिन कब तक?’, ‘होंगे जुदा ना हम’, ‘नवरी मिळे हिटलरला’ अशा अनेक मालिकांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.
याबरोबरच तो बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्येदेखील सहभागी झाला होता. तसेच ‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वातदेखील वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाला होता. राकेश सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झाला आहे.
या पर्वात त्याच्याबरोबर दिपाली सय्यद, प्रभू शेळके, दिव्या शिंदे, रुचिता जामदार, सारग कारंडे, रोशन भजनकर, आयुष संजीव, विशाल कोटीयन, तन्वी कोलते असे एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. या १७ स्पर्धकांतील राधा पाटील घराबाहेर पडली आहे.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात पहिल्या आठवड्यापासूनच भांडणे, वादविवाद, मतभेद पाहायला मिळाले. एक ग्रुपदेखील निर्माण झाला, ज्याला टोळी असे म्हणले जाते. ज्यामध्ये विशाल कोटियन, अनुश्री, रुचिता जामदार आणि इतर काही सदस्यांचा समावेश आहे. इतर स्पर्धकांमध्ये कधी मैत्री तर कधी वाद होताना दिसतात.
“दिव्या माझी बहीण आहे..”
आतापर्यंत घरात दीपाली सय्यद आणि राकेश बापट यांच्यात उत्तम समीकरणे असल्याचे दिसत होते. आता मात्र त्यामध्ये फूट पडणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.
कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, दिव्या आणि राकेश किचनमध्ये आहेत. ते तिथे काहीतरी काम करत आहेत. समोरच खुर्चीवर दीपाली सय्यद बसली आहे. राकेश म्हणतो, “लोक रंग बदलतात, हे मला दिसत आहे.”
दीपाली सय्यद म्हणते, “मला त्या दिवशीच नॉमिनेशनच्या वेळी रंग बदलताना दिसले.” त्यावर राकेश म्हणतो, “दिव्या माझी बहीण आहे, मी तिच्या पाठीशी उभा राहणार”, राकेशचे बोलणे ऐकून दीपाली म्हणते, “म्हणजे मी तुझी मैत्रीण नव्हती? तू न्यूट्रल राहायला पाहिजे होतंस. इकडे प्रत्येकजण स्वत:साठी खेळत आहे.” त्यावर राकेश म्हणतो, “लोकं कृतघ्न असतात”, दीपाली म्हणते, “तुम्हीसुद्धा आहातच.” दीपाली आणि राकेश यांच्यात वाद झाल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “दीपाली आणि राकेशच्या मैत्रीत पडलेली फूट कोणता ट्विस्ट घेऊन येणार?” अशी कॅप्शन दिली आहे.
आता दीपाली आणि राकेशमधील हा वाद मिटणार का, नेमकं काय घडणार, त्यांच्या मैत्रीत कायमची फूट पडणार का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. तसेच, आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

