Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed : ‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात राखी सावंत आणि दिपाली सय्यद यांच्यात मोठं भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. “दिपालीचं लग्न झालेलं आहे तरीही ती राकेशबरोबर अफेअर करते” असं गंभीर वक्तव्य यावेळी राखीने केलं. सुरुवातीला दिपाली आणि राकेश या दोघांनीही तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण, राखी काही केल्या बडबड करायची थांबत नव्हती. दिपालीच्या वैयक्तिक आयुष्यावर राखी अनेक गोष्टी बोलली, यानंतर या वादात तन्वीने हस्तक्षेप केला.

“राखी तू मर्यादा ओलांडून दिपाली ताईला बोलते आहेस” असं तन्वीने तिला सांगण्याच प्रयत्न केला पण, राखी कोणाचंही ऐकली नाही. शेवटी विशाल सुद्धा राखीवर भडकला होता. कोणाच्याही लग्नावर, कुटुंबावर बोलू नकोस असं विशालने राखीला ठामपणे सांगितलं पण, याचा काहीच परिणाम झाला नाही.

राखीमुळे आता दिपाली प्रचंड वैतागली आहे. आजच्या भागात ती रडत-रडत आपल्या मनातील भावना व्यक्त करेल. दिपाली म्हणते, “आंतरधर्मीय लग्न, २६ वर्षांचा संसार…ही खूप मोठी गोष्ट आहे. तिने माझ्या लग्नाचा विषय नव्हता काढला पाहिजे. ती फार चुकीचं बोललीये. मी तिचं बाकी सगळं सहन करेन पण, ही गोष्ट नाही.”

यावेळी राकेशला सुद्धा दिपालीसाठी वाईट वाटतं. तो राखीजवळ जातो आणि तिला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करतो. राकेश तिला म्हणतो, “राखी एखाद्याच्या चारित्र्यावर जाणं ही चुकीची गोष्ट आहे. तुला माझ्याबद्दल जराही काहीतरी आदर असेल, तर तू तिला मी सांगतो म्हणून एकदा सॉरी बोल.”

नेमकं काय घडलं होतं?

राकेश आणि दिपाली गार्डन एरियामध्ये गप्पा मारत बसलेले असतात. यावेळी राखी येऊन दिपालीला म्हणते, “तू घाण केली आहेस…हे राकेशचं प्रेम आहे. सगळीकडे तू घाण करतेस. राकेशबरोबर अफेअर करते…लग्न झालंय तरी हे करतेस. थू…! तुझ्या मनात फक्त घाण आहे. तुझ्यासारखी बाई लग्न झाल्यावर असं वागतेय. काय अमरप्रेम आहे.”

एका क्षणानंतर दिपालीचा संयम संपतो आणि ती राखीला सुनावते, “माझ्या लग्नावरून बोलू नकोस…तुला मी शेवटचं सांगतेय. २६ वर्षे झालीत माझ्या लग्नाला…तुझ्यासारखं नाहीये, मी माझं लग्न टिकवलंय.” आता या सगळ्या वादानंतर राखी खरंच दिपालीची माफी मागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राखीने दिपालीच्या वैयक्तिक आयुष्यावर केलेल्या टिपण्णीवर प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता रितेश राखीला भाऊच्या धक्क्यावर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.