Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात आज एक विशेष टास्क पार पडला. यामध्ये घरातील पुरुष सदस्यांना कोणत्याही एका स्त्री सदस्याचं कौतुक करायचं होतं. या टास्कनंतर राखी सावंत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
राखी सावंत तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद यांच्यासमोर प्रचंड भावुक झाली होती. ती म्हणाली, “मला माझी इमोशनल बाजू सर्वांसमोर दाखवायला अजिबात आवडत नाही. मला सगळ्यांकडून असं प्रेम मिळण्याची सवय राहिलेली नाहीये. मला शिव्या द्या…मला काहीही बोला पण, प्रेम नको. आता साडेतीन वर्षे झाली आई-बाबा मला सोडून गेले, घटस्फोट झाला. एवढं सगळं होऊन आयुष्यात मी कधीही हरले नाहीये. मी बिग बॉसमध्ये असताना आईचं निधन झालं होतं…”
“मी शोमध्ये येण्यापूर्वी आईसाठी नवऱ्याला १० लाखांचा चेक दिला होता की, काहीही झालं तरी आईला काही होऊ देऊ नकोस. तिला रुग्णालयात दाखल कर आणि पैसे भर हा निरोप मी त्याला देऊन शोमध्ये आले होते. माझ्या घरात फक्त मी कमवत होते. मी त्याला बोलले होते की, तुझ्यावर विश्वास आहे…तू नवरा आहे मी जाते बिग बॉसमध्ये… नवऱ्याने तेव्हा मला सांगितलं होतं, ‘तू जा…तुझी आई तिच माझी आई मी तिचं सगळं करणार’ पण, जेव्हा मी शोमधून बाहेर आले तेव्हा आई नव्हती. शोमध्ये फिनाले झाला आणि मी तेव्हा आईसाठी रुग्णालयात होते. माझी आई गेली…त्या नवऱ्याने मी दिलेले सगळे १० लाख रुपये उडवले तेव्हा, मी शोमध्ये होते मला काहीच माहिती नव्हतं. तू माझं सगळं घे…पण, माझ्या आईला वाचवलं हवं होतं. आई कोमात गेली होती…मी तेव्हापासून साडेतीन वर्षे एकटी आहे.” असं राखीने सांगितलं.
राखीची व्यथा ऐकून प्राजक्ता शुक्रे सुद्धा भावुक झाली होती. प्राजक्ता राखीला रडताना पाहून गार्डन एरियामध्ये एकटीच बसली होती. ती म्हणाली, “सगळं ते आवरण घालून आयुष्य जगतेय हे कठीण असतं. एकटेपणा किती खातो माणसाला…आज राखीसाठी खरंच खूप वाईट वाटतंय.”
दरम्यान, राखीने आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रॉपर्टीचं नुकसान केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर तिला शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. आता पुढच्या आठवड्यात राखीला कॅप्टन्सी उमेदवारीत भाग घेता येणार नाही. आता यावर रितेश काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

