Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आजपासून नवव्या आठवड्याची सुरुवात होणार आहे. नुकतीच शोमधून रुचिता जामदारने एक्झिट घेतली. तिचं एलिमिनेशन प्रत्येकासाठी धक्कादायक होतं. पहिल्या दिवसापासून रुचिताचं नाव घरातील प्रत्येक वादात घेतलं जात होतं. त्यामुळे अनेकांनी तिचं एव्हिक्शन फेअर असल्याचंही म्हटलं आहे. पण, रुचिता घराबाहेर गेल्यावर एक मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे ‘टोळी’ अखेर फुटली आहे. आता टोळीचा एकमेव सदस्य विशाल ‘बिग बॉस’च्या घरात आहे. आता विशाल हा गेम कसा खेळणार? त्याच्याशी कोण मैत्री करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विशाल एकमेव असा सदस्य आहे जो बेडरूममध्ये न झोपता लिव्हिंग रूममध्ये जिथे डेन्यूब प्रॉपर्टी आहे तिथे विश्रांती घेताना दिसतो. याच खोलीच्या स्वच्छतेवरून विशाल आणि कॅप्टन राखी सावंत यांच्या जोरदार भांडण होणार आहे.

राखी सावंत विशालला म्हणते, “हा सोफा आहे आणि इथे सर्वांना बसायचं आहे.” कॅप्टनच्या जबाबदारीनुसार राखीला घराच्या स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष द्यायचं असतं. आता जाब विचारणाऱ्या राखीला पुढे विशाल सांगतो, “मी बाहेर होतो तेव्हा बेड नीट करायचा होता.”

शेवटी विशाल काहीही केल्या सोफ्यावरून उठायला तयार नसतो. यावेळी राखी त्याला धमकी देते. “तू उठणार आहेस की नाही? अन्यथा मी इथे पाणी टाकेन” विशाल यानंतर संतापतो तो म्हणतो, “ठिक आहे टाक पाणी…मग मी सगळ्यांच्या बेडवर पाणी टाकेन”

यानंतर राखी मोठ्या बकेटमध्ये पाणी घेऊन येते आणि हे पाणी आरडाओरडा करून विशालच्या बेडवर ओतते. यावेळी बाजूला उभी असलेली तन्वी तिला पाणी फेकण्यापासून अडवते पण, राखी अजिबात ऐकत नाही शेवटी राखीने पाणी ओतल्यावर तन्वी जोरात किंचाळते.

आता यानंतर विशाल काय करणार? तो सगळ्यांचे बेड खराब करेल का? या दोघांच्या भांडणात कोण मध्यस्थी करणार याचा खुलासा आजच्या भागात होईल.

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “विशाल भाऊंचा कमबॅक”, “आता रुचिता गेल्यावर विशाल एकटा पडलाय त्यामुळे सगळे त्याला टार्गेट करतील”, “राखी फायर आहे खरंच पाणी टाकलं”, “आता विशाल कोणाचेच बेड नीट नको ठेवूस” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.