Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू आहे. दरवर्षी या शोमध्ये नवीन सदस्य सहभागी होतात, शोची थीम वेगळी असते. पण, या सगळ्यात ‘बिग बॉस’ आणि राखी सावंत हे एक वेगळं समीकरण तयार झालंय. यापूर्वी राखी ‘बिग बॉस’च्या हिंदी अन् मराठी अशा दोन्ही सीझनमध्ये सहभागी झालेली आहे. पण, यावर्षी सहाव्या सीझनमध्ये ही ड्रामा क्वीन पुन्हा एकदा परतली आहे.
राखीने WildCard एन्ट्री घेतल्यामुळे बाहेरून तिला बऱ्यापैकी कोणकोणते सदस्य कसे खेळत आहेत याबद्दल माहिती होती. याशिवाय दररोज घरात नवनवीन ड्रामा कसा क्रिएट करायचा हे राखीला अगदी बरोबर जमतं. राखी सर्वांचं मनोरंजन करते…ती आल्यापासून ‘बिग बॉस’चे प्रोमो सुद्धा तिच्यावर आधारित असतात, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण, प्रेक्षकांचं मनोरंजन करताना, घरात सतत गेम खेळताना राखी अनपेक्षितपणे अनेकांच्या भावना दुखावून जाते. कदाचित या गोष्टी तिला समजत नसतील…पण, तिचे शब्द निश्चितच एखाद्याच्या भावना दुखावतील असे असतात.
घरात एका वादादरम्यान राखी सावंत रुचिता-विशालला “तुमचा लव्ह लपाटा” असं म्हणाली होती. यानंतर गेल्याच आठवड्यात राखी अनुश्रीला “बाXX औरत” म्हणाली. ही काही मोजकी उहाहरणं आहेत. पण, अनेकदा राखी समोरच्या व्यक्तीच्या मनाला लागतील असे शब्द वापरते.
आता अनेकांना असं वाटेल की, हा तिच्या गेमचा भाग आहे…राखी असाच गेम खेळते. पण, गेम म्हणून शोमधल्या किचनची भांडी फोडणं, कुठेही पाणी फेकणं…हे कितपत योग्य आहे? राखीने किचनमधील भांडी फोडल्यावर तिला कॅप्टन होता येणार नाही अशी शिक्षा ‘बिग बॉस’कडून देण्यात आली होती. पण, या एक आठवड्याच्या शिक्षेचा राखीवर काय परिणाम झाला? खरंतर काहीच नाही. यंदाच्या सीझनमध्ये आणखी एक गोष्ट पाहायला मिळतेय ती म्हणजे लव्ह अँगल.
राकेश आणि राखीला एकमेकांच्या नावाने चिडवलं जातं…सगळी मजा-चेष्टा सुरूये इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत. पण, राकेशशी वाद झाल्यावर राखीने चिडून केस कापणं, स्विमिंगपूलमध्ये उडी मारणं…या सगळ्या कृती पाहून नेटकऱ्यांना सुद्धा प्रश्न पडतो हा खरंच ‘बिग बॉस’ शो आहे की लव्ह बॉस?
राखीचा ड्रामा प्रत्येकाला आवडतो…पण, तिचा ‘ओव्हर ड्रामा’ कोणालाच पटत नाही. यापूर्वी ती ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आणि चौथ्या सीझनमध्ये सुद्धा सहभागी झाली होती. पाचवा सीझन निक्की, जान्हवीने गाजवल्यामुळे राखीला फक्त एकाच वीकेंडला गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं. पण, आता सहाव्या सीझनमध्ये राखी पुन्हा एकदा आलीये.
उषा नाडकर्णी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, कदाचित राखीला टीआरपीसाठी बोलावतात…म्हणजे हे सगळं टीआरपीसाठी सुरूये हे सर्वश्रुत आहे. पण, टीआरपी वाढवताना राखीमुळे जे लोक दुखावले जातात त्यांचं काय?

कदाचित या सगळ्याचा शो संपल्यावर राखीवर काहीच परिणाम होणार नाही. पण, ज्यांचं करिअर नुकतंच सुरू झालंय त्या सदस्यांचं काय? महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं काय? ते या ‘ओव्हर ड्रामा’ला कंटाळलेत…आणि रितेश भाऊंना एकच प्रश्न विचारत आहेत प्रत्येक सीझनला राखी का हवी?
