Bigg Boss Marathi 6 Rakhi Warns Vishal : दरवर्षीप्रमाणे या सीझनमध्ये सुद्धा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सगळ्या सदस्यांची शाळा भरणार आहे. या टास्कदरम्यान गणिताच्या तासाला घरात मोठा गोंधळ होणार आहे. हा गोंधळ नेमका काय आहे पाहुयात…
‘बिग बॉस’च्या शाळेत गणिताचा तास सुरू असतो. या टास्कमध्ये राखी आणि विशाल एकमेकांना भिडणार आहेत. तन्वी राखीला रुचिताकडून चेंडू हिसकावून घ्यायला सांगते. रुचिताकडून चेंडू घेण्यासाठी राखी तिच्याजवळ जाणार इतक्यात विशाल मागून येतो आणि राखीला उचलतो. विशाल असं काहीतरी करेल याची राखीला कल्पनाच नाहीये असं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय.
विशालने काहीही न विचारता राखीला उचलून दुसरीकडे नेलंय हे प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. विशालच्या या कृतीमुळे राखी प्रचंड संतापते. यानंतर विशाल आपली बाजू मांडत असतो पण, राखी त्याला म्हणते, “विशाल ही तुला शेवटची वॉर्निंग आहे…यापुढे मला हात लावू नकोस” हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राखीचं म्हणणं अगदी योग्य असून अशाप्रकारे उचलणं चुकीचं आहे असं नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे. “राखी त्या विशालच्या कानाखाली मार…त्याने अगदी चुकीचं केलंय”, ‘हा विशाल ओव्हर करतोय”, “बेशिस्त विद्यार्थी”, “टास्कचा बट्ट्याबोळ कसा करायचा हे शिकून घ्या बरे…”, “खरंच विशालचं चुकलंय हे असं कोण उचलतं?”, “बरं झालं राखीने त्याला वॉर्निंग दिलीये” अशा असंख्य प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
आता विशालच्या या कृतीवर रितेश भाऊच्या धक्क्यावर त्याला काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय विशालने यानंतर घरात राखीची माफी मागितलीये की नाही हे सुद्धा आजच्या भागात स्पष्ट होईल.
दरम्यान, या सातव्या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी फक्त चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. प्राजक्ता शुक्रे, राखी सावंत, राकेश बापट आणि रोशन भजनकर या चार जणांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असेल. आता यांच्यापैकी ‘बिग बॉस’च्या घरातून कोण एलिमिनेट होणार हे वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होईल.

