Bigg Boss Marathi 6 Raqesh-Vishal Fight : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतंच राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. नॉमिनेशन टास्कदरम्यान विशालने राकेशच्या वैयक्तिक आयुष्यावर कमेंट करत त्याच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं. गेममध्ये वैयक्तिक गोष्टी काढणं अतिशय चुकीचं आहे असं म्हणत यावेळी राकेशने संताप व्यक्त केला. पण, हा मुद्दा इथेच थांबला नाही…विशाल रागात राकेशच्या अंगावर धावून सुद्धा गेला. शेवटी ‘बिग बॉस’ने मध्यस्थी केल्यावर हा वाद तात्पुरता मिटला.
मात्र, या घटनेवर आता मराठी मनोरंजन विश्वातील विविध कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मेघा धाडे, रुपाली भोसले या अभिनेत्रींनी विशालच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. याशिवाय राकेशच्या बापटच्या कुटुंबीयांकडून “आम्हाला न्याय हवाय” असं निवेदन देखील जारी करण्यात आलं आहे. आता यानंतर राकेशच्या बहिणीने स्वत: व्हिडीओ शेअर करत विशालच्या PR टीमला सुद्धा खडेबोल सुनावले आहेत.
शीतल बापट सांगतात, “नमस्कार महाराष्ट्र! तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की, माझा भाऊ राकेश सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आहे. गेल्या काही दिवसांपासून जे घडतंय ते एकदम चुकीचं आणि Unacceptable आहे. या सगळ्या घटनेचा निषेध आम्ही रितसर पोस्ट शेअर करत नोंदवला आहे.”
“एखाद्याच्या अंगावर धावून जाणं हे कोणत्याच नियमात बसत नाही”
शीतल पुढे म्हणाल्या, “आज सकाळी सोशल मीडिया पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, विशाल कोटियनची PR टीम आता काही व्हिडीओ बनवण्यात बिझी झालेली आहे. त्याची टीम हे व्हिडीओ शेअर करतेय, आता त्याच्या टीमला मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्वत: शेअर करणं वेगळं आणि दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणं वेगळं… या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, ‘बिग बॉस’च्या नियमांनुसार घरात सर्वच सदस्यांनी फक्त गेमपुरतं बोललं पाहिजे. तुम्हाला एखादा सदस्य आवडत नसेल तर व्होटआऊट करा किंवा जे गेमच्या अनुषंगाने योग्य वाटेल ते करा. पण, हे सगळं गेमपुरतं मर्यादीत असलं पाहिजे. दुसऱ्यांबद्दल चुकीचं बोलून त्यानंतर तुम्ही घरातील वातावरण बिघडवता, हिंसा करता हे अजूनच अयोग्य आहे. एखाद्याच्या अंगावर धावून जाणं हे कोणत्याच नियमात बसत नाही. सगळं ऑन कॅमेऱ्यावर झालेलं आहे.”
“दुसरे काही व्हिडीओ सुद्धा मी पाहिले, ज्यात त्याची पीआर टीम जुने काही व्हिडीओ सुद्धा वापरतेय. हे अगदी चुकीचं आहे…चूक झालीये तर ती स्वीकारा, मान्य करा. उगाच त्या चुकीचं समर्थन करू नका. मला फक्त एकच गोष्ट सांगायचीये ती म्हणजे, अशाच स्वरुपाचा कंटेट आम्ही सुद्धा बनवू शकता. पण, आम्ही ते करणार नाही आणि राकेशला सुद्धा ते आवडणार नाही. आमच्या आयुष्यात काही तत्त्व आहेत म्हणून आम्ही गप्प आहोत. इथून पुढे आम्ही या मुद्द्यावर बोलणार नाही, या घाणेरड्या गोष्टीबद्दल बोलण्याची मला गरज नाहीये. पण, माझं पुन्हा एकदा रितेश देशमुख आणि बिग बॉस मराठी या शोला हेच सांगणं आहे की, आत जे काही घडलंय ते अगदी चुकीचं आहे…तुम्ही यावर योग्य निर्णय घ्या आणि त्यापलीकडे जे काही आता बाहेर सुरूये ते सुद्धा चुकीचंच आहे. आता ट्रोलिंग करा…काहीही करा, मला फरक पडत नाही. जे चुकीचं आहे त्याला मी चुकीचंच बोलणार आहे.” असं स्पष्ट मत शीतल बापट यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, आता या सगळ्या प्रकरणावर रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
