Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये घरातील सदस्यांना प्रत्येक टास्कमध्ये विशिष्ट रेशन कार्ड जिंकायचं आहे. म्हणजेच गोल्डन रेशन कार्ड जिंकणाऱ्या सदस्यांना घरातील सगळ्या सुखसुविधांचा लाभ घेता येतो. सिल्व्हर रेशन कार्ड जिंकणाऱ्यांना तुलनेने कमी गोष्टींचा लाभ घेता येतो. उदा. सामान मुबलक प्रमाणात पाठवलं जातं, अंडी-साखर यांसारख्या वस्तू वेळेवर पाठवल्या जात नाहीत. तर, ब्राँझ रेशन कार्ड जिंकणाऱ्यांना यातील कोणत्याच सुविधा मिळत नाही. या सदस्यांना बेडचा वापर करता येत नाही, रात्री जमिनीवर झोपायचं, एकाच वॉशरूमचा वापर करता येणार असे बरेच वेगवेगळे नियम ब्राँझ रेशन कार्ड धारकांसाठी आहेत.

पण, या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये बऱ्याच सदस्यांचं एकमत न झाल्याने ‘बिग बॉस’ने संपूर्ण घराला ब्राँझ रेशन कार्ड लागू केलं होतं. यामुळे कॅप्टन आयुष वगळता प्रत्येकजण जमिनीवर झोपत होता. याशिवाय १६ सदस्यांना मिळून एकच वॉशरूम उपलब्ध होतं. यामुळे बऱ्याच जणांना मनस्ताप झाला. यादरम्यान, छोटा डॉन प्रभू शेळकेने अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्याबाबत रितेशने प्रभूला भाऊच्या धक्क्यावर जाब विचारला आहे.

Bigg Boss Marathi 6 – प्रभूचं वय किती?

‘बिग बॉस मराठी’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेशने प्रभू आता २० वर्षांचा आहे असंही सर्वांना सांगितलंय. रितेश त्याला म्हणाला, “प्रभू तुम्ही हद्दपार केलीये…तुम्ही स्वत: म्हणालात ‘मी २० वर्षांचा आहे’ आणि असंच मला वागवा. आता आजपासून मी तुम्हाला तसंच वागवणार. दोन आठवडे तुमचं कौतुक केलं, तुमचे लाड झाले…आता तुम्ही लाडात आला आहात. उद्धटपणे वागताय. नियम मोडताय…आता बास झालं!”

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “बरं झालं फायनली भाऊ याला बोलले…काही करत नाही नुसती बडबड सुरू असते याची… कुठे सूरज चव्हाण आणि कुठे हा…”, “भाऊ हे पटलंय बरं का”, “बरं झालं या प्रभूला असंच पाहिजे”, “सळो की पळो करून सोडा भाऊ”, “बरं झालं याला असंच पाहिजे… उद्धट वागणं आणि उलट बोलणं कमाल आहे याची” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.