Bigg Boss Marathi 6 Day 34 Bhaucha Dhakka Promo : ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये पाचव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घरात राखी सावंतची एन्ट्री झाली. तिने घरात एन्ट्री घेतल्यावर एकच धुमाकूळ घातला. जे सदस्य आजवर कॅमेऱ्यासमोर येत नव्हते, काहीही बोलत नव्हते, गेम खेळत नव्हते त्यांना सुद्धा राखीने थेट सुनावलं. रुचिता आणि राखी यांच्यात घरात टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. रुचिताचं वागणं तसंही पहिल्या दिवसापासून घरातील अनेक सदस्यांना पटत नाहीये.

सध्या घरातील प्रत्येक सदस्यांचा एक ग्रुप तयार झाला आहे. रुचिता, विशाल, रोशन, अनुश्री हे चौघंही ( टोळी गँग ) कायम एकत्र असतात. तर, दुसरीकडे दिपाली, तन्वी आणि राकेश यांचा एक ग्रुप तयार झाला आहे. राखीची आता तन्वी कोलतेशी चांगलीच गट्टी जमली आहे. या आठवड्यात झालेल्या एका टास्कदरम्यान रुचिताने दिपालीकडे बघून चुकीचं वर्तन केलं होतं. याबद्दल तिला भाऊच्या धक्क्यावर जाब विचारण्यात आला.

रितेशने जाब विचारताच रुचिताचे चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स बदलले. तिला तिची चूकही मान्य नव्हती…तिने मध्ये बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला. यामुळेच संतापलेल्या रितेशने, “तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर जागा नाही” असं तिला सांगितल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

एकंदर तिची भाऊच्या धक्क्यावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता रुचिताला खरंच दुसरीकडे बसवलं जाणार की, रुचिता रितेशची माफी मागणार हे एपिसोड ऑन एअर झाल्यावर स्पष्ट होईल.

नेमकं काय घडलं?

रितेश देशमुख रुचिताला म्हणाला, “रुचिता…दिपाली यांच्याकडे बघून तुम्ही काय केलंत? आ…थू! तुम्ही थुंकलात…तुम्ही जे वागलात ते महाराष्ट्रातील कोणत्याच आईला आवडलं नसेल. ( यानंतर रुचिता तोंड फिरवून विचित्र एक्स्प्रेशन्स देते ) पुढे रितेश तिला म्हणतो, “ओ तुम्हाला जर असे हे सगळे एक्स्प्रेशन्स द्यायचे असतील…तर आत जा! भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही. अप अँड गो…ही स्क्रीन बंद करा.”

दरम्यान, नेटकऱ्यांनी सुद्धा या प्रोमोवर कमेंट्स करत रितेशने अगदी योग्य केल्याचं म्हटलं आहे. आता रुचिताशिवाय रितेश भाऊच्या धक्क्यावर आणखी कोणत्या सदस्याची शाळा घेणार? राखीने बिग बॉसची प्रॉपर्टी फोडलीये त्यावरून तिला काय बोललं जाईल? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.