Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka Updates : ‘बिग बॉस मराठी’चे प्रेक्षक प्रत्येक वीकेंडची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण, रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर त्याला अन् प्रेक्षकांना न पटणाऱ्या गोष्टींचा जाब घरातील सदस्यांना विचारतो. सध्या घरातील काही सदस्य फ्रंटफूटवर येऊन हा गेम खेळत आहेत. तर, काही सदस्य अजूनही बॅकफूटवर खेळताना दिसत आहेत.

रितेशने या आठवड्यात अशाच एका बॅकफूटवर खेळणाऱ्या सदस्याची शाळा घेतली आहे. तिचं नाव आहे दिव्या शिंदे. खरंतर, घराबाहेर दिव्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिला चाहत्यांचा सपोर्ट सुद्धा मिळताना दिसतोय. पण, ‘बिग बॉस’च्या घरात दिव्या फ्रंटफूटवर खेळताना दिसली नाहीये. यामुळे रितेशने तिला जाब विचारला आहे.

दिव्या घरात स्वत:पेक्षा जास्त राकेश बापटसाठी स्टँड घेताना दिसतेय. कारण, तिने राकेशला आपला भाऊ मानलेलं आहे. या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये सुद्धा तिने राकेशला शेवटपर्यंत डिफेंड केलं. परिणामी एकमत न झाल्याने सगळ्यांना सिल्व्हरऐवजी ब्राँझ रेशन कार्ड मिळालं. यामुळेच रितेश दिव्याला तुम्ही घरात ‘लाडका भाऊ योजना’ सुरू केलीये असं म्हणाला.

रितेशने दिव्याला तिच्या गेमबाबत आरसा दाखवला आहे. तो म्हणाला, “घरात एक लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे आणि त्याची सुरुवात दिव्या तुम्ही केलीये. ‘राकेश दादा हे…राकेश दादा ते…’ तुमचं घरातील नातं दिसतंय पण, गेमचं काय? गेम दिसत नाहीये. तुम्ही बाहेर लीडर आहात ना? इथे फक्त सपोर्टर दिसताय. राकेश यांच्या प्रवक्ता”

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “रितेश आला की कुणालाच सुट्टी मिळत नाही”, “बरं झालं…दिव्या एकटी हा गेम खूप छान खेळू शकते”, “राकेश फक्त गेमसाठी त्यांना जवळ करतोय”, “विषय संपला”, “हेच ऐकायचं होतं आम्हाला”, “मस्त झापलंय”, “भाऊ आल्यावर नो सुट्टी” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, या आठवड्यात सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत, रुचिता जामदार असे एकूण आठ सदस्य नॉमिनेट आहेत. यांच्यापैकी कोणाचा प्रवास संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.