Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : ‘बिग बॉस मराठी’चा सहाव्या सीझनचा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आज ९० व्या दिवशी यंदाच्या सीझनचा शेवटचा भाऊचा धक्का पार पडणार आहे. पुढच्या आठवड्यात रविवारी १९ एप्रिलला हा शो सर्वांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्याआधी रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर कोणाची शाळा घेतलीये ते पाहुयात…

‘बिग बॉस मराठी’चा हा आठवडा गाजला तो राखी सावंत आणि दिपाली सय्यद यांच्यामधील भांडणामुळे! “दिपालीचं लग्न झालेलं आहे तरीही ती राकेशबरोबर अफेअर करते” असं गंभीर वक्तव्य यावेळी राखीने केलं, याशिवाय ती दिपालीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी बोलली. दिपालीला या सगळ्याचा भयंकर त्रास झाला. राखी तिची माफी मागण्यास सुद्धा तयार नव्हती. नेहमी विरुद्ध टीममध्ये खेळणारा विशाल सुद्धा राखीचं बोलणं ऐकून संतापला होता.

आता या सगळ्याचा जाब रितेश देशमुख राखीला भाऊच्या धक्क्यावर विचारणार आहे. रितेश तिला म्हणतो, “राखी एखाद्याच्या चारित्र्यावर जर प्रश्न उपस्थित केले जाणार असतील तर त्याठिकाणी मला उभं राहून त्या सदस्याची बाजू घ्यावी लागेल. दिपालीबद्दल तुम्ही ज्या-ज्या गोष्टी बोललात…खूप लिमिट क्रॉस केलीत. का आपण सगळ्यांना मानसिक त्रास देतोय? या घराच्या काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा पाळल्याच पाहिजेत.”

रितेशने चूक दाखवून दिल्यावर राखीला अश्रू अनावर होणार असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणात राखीची चूक असल्याच्या कमेंट्स या प्रोमोवर केल्या आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

राकेश आणि दिपाली गार्डन एरियामध्ये गप्पा मारत बसलेले असतात. यावेळी राखी येऊन दिपालीला म्हणते, “तू घाण केली आहेस…हे राकेशचं प्रेम आहे. सगळीकडे तू घाण करतेस. राकेशबरोबर अफेअर करते…लग्न झालंय तरी हे करतेस. थू…! तुझ्या मनात फक्त घाण आहे. तुझ्यासारखी बाई लग्न झाल्यावर असं वागतेय. काय अमरप्रेम आहे.”

एका क्षणानंतर दिपालीचा संयम संपतो आणि ती राखीला सुनावते, “माझ्या लग्नावरून बोलू नकोस…तुला मी शेवटचं सांगतेय. २६ वर्षे झालीत माझ्या लग्नाला…तुझ्यासारखं नाहीये, मी माझं लग्न टिकवलंय.”