Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का आज ( १७ जानेवारी ) पार पडणार आहे. आज भाऊच्या धक्क्यावर सर्वप्रथम रितेश देशमुख तन्वी कोलतेची शाळा घेणार आहे. यानंतर अभिनेता त्याचा मोर्चा रुचिता जामदारकडे वळवणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांना घरात प्रचंड ड्रामा पाहायला मिळाला. काही सदस्य फक्त फुटेजसाठी विनाकारण भांडताना दिसले. रुचिता जामदार सुद्धा यापैकीच एक. करण सोनावणेने रुचिताला तिची चोरलेली पॉवर Key देण्यास नकार दिला. त्यामुळे रुचिताने घरात प्रचंड आरडाओरडा सुरू केला. करणसमोर ती हात वगैरे जोडताना दिसली. पण, हे सगळं क्षणभर होतं…ज्यावेळी करणने चावी देण्यास ठाम नकार दिला त्यानंतर रुचिता घरातील बाल्कनी एरियामध्ये जोरजोरात ओरडू लागली. अपशब्द वापरत होती…यावेळी सोनालीला सुद्धा ती बरंच काय-काय बोलली. पण, शेवटी सोनालीने तिची समजूत काढली आणि इतका राग-राग करू नकोस हे आरोग्यासाठी बरं नसतं असा सल्ला तिला दिला.
तरीही, रुचिताने आपल्या वागणुकीत काहीच बदल केला नाही. कॅप्टन्सी कार्यात सुद्धा ती तशीच वागत होती. यावेळी सुद्धा रुचिता-करणमध्ये वाद झाले. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच आठवड्यात तिने अनेकांशी हुज्जत घातली. प्रत्येकाशी धमकीच्या स्वरात बोलत होती… या भांडणांदरम्यान रुचिताचा आवाज प्रचंड लाऊड असतो. त्यामुळे आता थेट भाऊच्या धक्क्यावर तिची शाळा घेतली जाणार आहे.
रितेश देशमुख रुचिताला म्हणाला, “रुचिता जामदार…तुम्ही काय म्हणता? मी वाघीण आहे वाघीण…अहो पण महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वत:ला पंजा मारणारी वाघीण पाहिली. महाराष्ट्राला वाटलं होतं तुम्ही या घराचा Voice व्हाल. पण, सध्याच्या स्थितीत तुम्ही फक्त Noise झाला आहात.”
रितेशचं बोलणं ऐकून रुचिताला प्रचंड त्रास झाला. ती यावेळी मान खाली घालून बसली होती आणि होस्ट जे काही सांगतोय ते ऐकत होती. नेटकरी या प्रोमोवर कमेंट्स करत लिहितात, “खूपच समर्पक शब्दांत तंतोतंत सांगितलं”, “Noise बंद करा…”, “स्वतःला पंजा मारणारी वाघीण”, “मज्जा आली राव”, “वाघीण पिंजऱ्यात जाती का काय…”, “कमाल प्रोमो टीम रितेश मजा आली” यासह याची फार गरज होती असंही असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, हा भाऊचा धक्का प्रेक्षकांना रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टारला पाहायला मिळेल.
