Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’च्या घरात दररोज भांडणे होतात. स्पर्धकांमध्ये सतत मतभेद पाहायला मिळतात. अनेकदा ही भांडणे विकोपाला जातात, तेव्हा घरात गोंधळ पाहायला मिळतात. आठवडाभर बिग बॉसच्या घरात जे काही घडते, त्यावर आठवड्याच्या शेवटी रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर बोलतो. जे चुकतात त्यांना कडक शब्दांत त्यांच्या चुकांची जाणीव करून देतो आणि जे बरोबर असतात त्यांना शाबासकीही देतो, त्यांचे कौतुक करतो.
या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. नॉमिनेशन टास्कमध्ये अनेक स्पर्धकांमध्ये मोठी भांडणे झालेली दिसली. मात्र, राकेश बापट व विशाल कोटियन यांच्या भांडणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विशालने राकेशच्या घटस्फोटाचा उल्लेख केला, त्यानंतर भांडणाचे स्वरूप मोठे झाल्याचे पाहायला मिळाले.
या भांडणात विशालने राकेशला धक्काही मारल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर हे भांडण फक्त बिग बॉसच्या घरापुरतेच मर्यादित राहिले नाही. बिग बॉसच्या घराबाहेरही त्याचे पडसाद पाहायला मिळाले. अनेकांनी राकेश बापटला पाठिंबा दिला. राकेश बापटच्या बहिणीने विशालचे हे वागणे अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले. याबरोबरच अनेक कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राकेश बापटला पाठिंबा दर्शविला. तसेच विशालच्या वागण्यावर टीका केली.
आता भाऊच्या धक्क्यावरदेखील विशाल कोटियनला त्याच्या वागण्याबद्दल चांगलेच सुनावले जाणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर केला आहे.
“तुम्ही राकेश यांना धक्का मारला नाही, तर…”
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, रितेश देशमुख विशाल कोटियनला म्हणाला, “तुम्ही राकेश यांना धक्का मारला नाही, तर तुम्ही जिंकण्याची जी ट्रॉफी आहे, त्याला धक्का मारला. तुम्ही स्वत:चा गेम खराब करत आहात, असं वागणं स्वीकारलं जाऊ शकत नाही. तुम्हाला थेट सांगतो, महाराष्ट्राला पटलेलं नाही.” यादरम्यान विशाल शांत बसलेला दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “विशालच्या unacceptable वागण्याला भाऊच्या धक्क्यावर बसणार कडक ‘धक्का’”, अशी कॅप्शन दिली आहे.
या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “याला बाहेर काढा”, “थेट बाहेर काढा”, “याला बाहेर का काढलं नाही?”, “त्याच्याकडे खूप अहंकार आहे, पहिल्या दिवसापासूनच तो स्वत:ला काय समजतो, काय माहीत”, “विशालचा गेम चांगला आहे”, “आमच्यासाठी विशाल विजेता आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.


आता बिग बॉस मराठीचे हे सहावे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. आता बिग बॉसच्या घरात आणखी काय घडणार, या पर्वाचा विजेता कोण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
