Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर बराच धुमाकूळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे रितेश देशमुख या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर नेमकी कोणत्या सदस्यांची शाळा घेणार हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले होते. रितेशने सुरुवातीला रुचिताची कानउघडणी केली. तसेच चुकीचे एक्स्प्रेशन्स द्यायचे असतील तर तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर जागा नाही असं स्पष्ट शब्दांत रितेशने रुचिताला सांगितलं. आता रुचिता पाठोपाठ रितेश विशालची पोलखोल करणार आहे.
विशाल कोटीयन आणि रुचिता यांची एकमेकांशी घट्ट मैत्री आहे. विशाल रुचिताला म्हणाला होता, “दिपाली सय्यद फक्त दिसायला गोरी आहे, तिला रुप नाहीये. परदेशात दुकानातल्या सेल्स गर्ल सुद्धा अशाच दिसतात” असं वक्तव्य त्याने केलं होतं. विशालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.
विशालच्या या वक्तव्यावर बिग बॉसप्रेमींसह दिपालीचे चाहते आणि काही मराठी कलाकारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. याबाबत आता भाऊच्या धक्क्यावर विशालला जाब विचारण्यात आला आहे.
रितेश म्हणाला, “विशाल एखाद्याशी स्पर्धा करणं आणि त्याला Hate करणं या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक असतो. तुम्ही नेहमी म्हणता, आय हेट दिपाली, आय हेट तन्वी…अरे दुकानातल्या सेल्स गर्लसारखी दिसते… असे शब्द तुम्ही वापरलेत. तुम्हाला काय वाटतं? हे महाराष्ट्राला आवडलंय?”
रितेश देशमुखने विशालबाबत हा मोठा खुलासा केल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला होता. यावेळी स्वत:ची बाजू सावरून घेण्यासाठी विशाल ‘दिपाली माझी चांगली मैत्रीण आहे..’ असं म्हणाला. पण, याचा काहीच उपयोग झाला नाही. दिपाली प्रचंड रडत होती, ती विशालला उद्देशून म्हणाली, “नको बोलूस माझ्याशी प्लीज…चांगली मैत्रीण तर अजिबात नको बोलूस”
दरम्यान, आता भाऊचा धक्का पार पडल्यावर दिपाली विशालशी यापुढे बोलणार की नाही? विशाल तिची माफी मागेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय घरातील करण सोनावणे, आयुष संजीव, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, सचिन कुमावत आणि राकेश बापट हे सहा सदस्य सध्या नॉमिनेट आहेत. आता यांच्यापैकी कोणाचा प्रवास संपणार हे रितेश रविवारी भाऊच्या धक्क्यावर जाहीर करणार आहे.

