Bigg Boss Marathi 6 Promo : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या सहाव्या आठवड्याचा भाऊचा धक्का सुरू आहे. दर रविवारी रितेश भाऊ घरातील चुगलीचं दार उघडतात. याद्वारे स्पर्धकांना त्यांच्या मागून काय बोललं जातं, आपले मित्रमंडळी आपल्याविषयी काय चर्चा करतात याचा अंदाज येतो. यामुळे पुढचा गेम कसा खेळला पाहिजे, आपले कोण मित्र आहेत आणि कोण शत्रू…याबद्दलचा रिअ‍ॅलिटी चेक सदस्यांना मिळतो.

घरात पहिल्या दिवसापासून ‘टोळी’ ग्रुप एकत्र आहे. यामध्ये विशाल, रुचिता, अनुश्री आणि रोशन हे सदस्य आहेत. या चौघांचं पहिल्या दिवसापासून एकमेकांशी खूप चांगलं बॉण्डिंग आहे. अगदी विरुद्ध टीममध्ये असलेल्या राकेश बापटने सुद्धा या टोळीतील सदस्यांचं कौतुक केलं होतं. काहीही झालं तरी, टोळीतील मतं फुटत नाहीत…ते सगळे कायम एकत्र असतात असं राकेश म्हणाला होता. याशिवाय, रितेशने सुद्धा टोळीच्या गेम प्लॅनिंगचं अनेकदा भाऊच्या धक्क्यावर कौतुक केलं आहे.

पण, आता या टोळीत फूट पडणार आहे. रोशन भजनकरचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून रोशन या टोळीतून बाहेर पडला पाहिजे असं म्हणत होते. आता रोशनच्या चाहत्यांची ही इच्छा अखेर पूर्ण होणार आहे. भाऊच्या धक्क्यावर दाखवण्यात आलेल्या एका चुगलीमुळे संपूर्ण गेम पालटला जाणार आहे.

सुरुवातीला विशालला अनुश्रीची चुगली दाखवली जाते. यामध्ये अनुश्री तन्वीला स्पष्टपणे सांगत असते की, “मला विशालच्या विरोधात खेळायचं आहे.” ही चुगली पाहून विशाल म्हणतो, “आपलेच दात आणि आपलेच ओठ असं वाटलं.”

पुढे चुगली बूथवर जातो रोशन…त्याला रुचिताची चुगली दाखवली जाते. रुचिता विशालशी संवाद साधताना म्हणत असते, “रोशन दादाला गेम एवढा कळत नाही…” तर विशाल यावर म्हणतो, “मला त्याचा भार घेऊन चालायचं नाहीये.”

हा व्हिडीओ पाहून रोशनचं मन दुखावतं. कारण, रुचिताला तो आपली बहीण मानतोय. रोशन म्हणतो, “कुठेतरी मन दुखलं माझं…मी ही टीम सोडतोय आजपासून…आतापासून!”

हा प्रोमो पाहून रोशनचे फॅन्स खूश झाले आहेत. “अगदी बरोबर झालं…रोशनचे डोळे उघडले”, “आता एकटा खेळ भाऊ”, “रोशनचा बरोबर वापर केलाय या टोळीने”, “मला हेच हवं होतं मजा आली”, “रोशन आता दाखव आपली ताकद”, “रोशन दादा तुला सपोर्ट” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

तर, काही नेटकऱ्यांनी, “रुचिता एकदम बरोबर बोलतेय. रोशनला काहीच गेम कळत नाहीये…तो फक्त टास्कमध्ये तीन वाक्य बोलतो तेवढंच काय ते…अन्यवेळी दिसतही नाही.” अशाही कमेंट्स या प्रोमोवर केल्या आहेत.