Bigg Boss Marathi 6 Roshan Bhajankar: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सध्या विविध कारणांमुळे चर्चा सुरू आहे. नुकताच सागर कारंडे या पर्वातून बाहेर पडला. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरात रेवा, राकेश, राखी, दीपाली, विशाल, अनुश्री, तन्वी हे स्पर्धक उरले आहेत.
आता लवकरच उर्वरित स्पर्धकांमध्ये तिकीट टू फिनाले हा टास्क पार पडणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या सीझनची ट्रॉफी कोणाच्या नावावर होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
बिग बॉसच्या घरात अनेक नाती तयार होतात. कधी हे नाते मैत्रीचे असते, कधी बहीण-भावाचे, कधी प्रेमाचे, कधी आई-मुलाचे, तर अनेकदा ते शत्रुत्वाचे असते. बिग बॉसचा खेळ संपल्यानंतरही ही नाती तशीच राहतात का? खऱ्या आयुष्यात बिग बॉसमधील नाती असतात का? की ही नाती बिग बॉसच्या घरापुरतीच मर्यादित राहतात? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना कायम पडलेले असतात. काही स्पर्धक त्यांच्यातील मैत्रीचे नाते उत्तम पद्धतीने निभावताना दिसतात.
‘बिग बॉस मराठी’ फेम रोशन भजनकरने सहकुटुंब घेतली ‘या’ सदस्याची भेट
आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातून बाहेर पडलेल्या दोन स्पर्धकांनी परस्परांची भेट घेतली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. रोशन भजनकर व सचिन कुमावत हे ते दोन स्पर्धक आहेत.
रोशन भजनकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोशन भजनकरने सचिन कुमावतची सहकुटुंब भेट घेतल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला बिग बॉसमधील काही क्षण पाहायला मिळतात. त्यानंतर रोशन भजनकर व सचिन कुमावत एकमेकांची गळाभेट घेतात. व्हिडीओमध्ये त्यांची कुटुंबेदेखील पाहायला मिळत आहेत. व्हिडीओच्या शेवटी रोशन सचिन कुमावतला उचलून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना रोशन भजनकरने लिहिले, “खेळ तर संपला; पण नातं आता सुरू झालंय. बिग बॉसने मला सचिनदादांसारखा मोठा भाऊ दिला. भावासारखा मित्र आणि जिवाभावाचा माणूस”, असे लिहीत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. रोशनच्या या व्हिडीओवर अनेकांनी तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूप छान वाटले, असे लिहिले आहे.
दरम्यान, आता आणखी कोणत्या स्पर्धकांची मैत्री बाहेर आल्यानंतरही टिकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
