Bigg Boss Marathi Ruchita Jamdar Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बेघर होण्यासाठी या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट होते. प्राजक्ता शुक्रे, दिपाली सय्यद, सागर कारंडे, रुचिता जामदार, संस्कृती साळुंके, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांच्यापैकी कोण घराबाहेर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर शोमधून एक शॉकिंग अपडेट समोर आली आहे.
या आठवड्यातील नॉमिनेटेड सात सदस्यांपैकी रुचिता जामदार शोमधून एलिमिनेट झाली आहे. तिचा घरातील प्रवास संपला आहे. खरंतर, रुचिताचा पहिल्या दिवसापासून गेम पाहिला असता…ती टॉप-५ मध्ये नक्की जाईल असा अंदाज प्रेक्षकांचा होता. पण, गेल्या काही आठवड्यांपासून रुचिता घरात अनेकदा खचलेली आणि रडताना दिसली. रुचिता फक्त विशालच्या प्रभावाखाली खेळतेय असं वारंवार बोललं जात होतं. अखेर या सगळ्याचा फटका रुचिताला बसला असून तिचा घरातील प्रवास संपलेला आहे.
रुचिता जामदार शोमधून एलिमिनेट झाल्याची बातमी समोर येताच तिच्या तमाम चाहत्यांना मोठ्या धक्का बसला आहे. मात्र, अद्याप ‘कलर्स मराठी’ किंवा ‘बिग बॉस मराठी’ने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आठव्या आठवड्यात नेमकं कोण घराबाहेर जाणार याची घोषणा रविवारच्या भागात करेल. पण, सध्या सोशल मीडियावर रुचिता एलिमिनेट झाल्याच्या पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहेत.

रुचिता जामदार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासून चर्चेत होती. गेल्या आठ आठवड्यांमध्ये अनेकदा रितेशने सुद्धा रुचिताला तिच्या गेमबद्दल आरसा दाखवला होता. याशिवाय रुचिताचे घरातील बऱ्याच सदस्यांशी वाद झाले होते.
मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांसह महाराष्ट्रातील ‘बिग बॉस’ प्रेमींनी सुद्धा रुचिताच्या खेळावर प्रश्न उपस्थित करत तिच्या घरातील वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तिच्या एलिमिनेशननंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आता रुचिता खरंच एलिमिनेट झाली असेल तर संपूर्ण गेम पालटणार आहे.
दरम्यान, रुचिताबद्दल सांगायचं झालं तर, ‘रोडीज’ शोमुळे ती घराघरांत पोहोचली. ‘रोडीज’ असो वा नृत्याचा मंच, प्रत्येक ठिकाणी तिने स्वत:ची छाप पाडली आहे. याशिवाय तिने ‘बिग बॉस मराठी ६’चा सीझन सुद्धा चांगलाच गाजवला आहे.
