Bigg Boss Marathi 6 Ruchita Jamdar Interview : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमधून नुकतीच रुचिता जामदारची एक्झिट झाली. यंदा पहिल्या दिवसापासून तिने हा संपूर्ण शो गाजवला होता. भाऊच्या धक्क्यावर अनेकदा रुचिताची शाळा घेण्यात आली. अखेर आठव्या आठवड्यात रुचिता एलिमिनेट झाली. रुचिताची एक्झिट सर्वांसाठीच धक्कादायक होती.
रुचिताला स्वत:ला देखील तिचा ‘बिग बॉस’मधील प्रवास इतक्या लवकर संपेल असं वाटलं नव्हतं. याबद्दल तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधताना खुलासा केला आहे. याशिवाय विशाल-रुचिताची मैत्री सुद्धा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. आता घराबाहेर आल्यावर विशालबरोबरची मैत्री कायम ठेवणार का? याबद्दल रुचिताने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
रुचिता म्हणाली, “विशालशी शो संपल्यावर सुद्धा मी मैत्री कायम ठेवणार आहे. कारण, ते नातं गेमसाठी नव्हतं…आमचं नातं खरं होतं पण, प्रेम अजिबात नव्हतं. आमची एक भावनिक अटॅचमेंट होती. कारण, संपूर्ण घर एका बाजूला होतं…आणि आमच्याबाजूने कोणीच नव्हतं. माझ्या मैत्रिणीने ( अनुश्री ) साथ सोडली, जवळचा भाऊ ( रोशन ) एव्हिक्ट झाला…अशा परिस्थितीत आम्हीच एकमेकांसाठी होतो. यात प्रेम किंवा घाणेरडं काहीच नव्हतं. मी खूप हक्काने विशालला माझ्या घरच्यांना भेटवणार आहे.”
विशाल आणि माझ्यात प्रेम वगैरे अजिबात नव्हतं. पण, बाहेर लोकांना तसं दिसलं आणि या सगळ्याचा घरच्यांना देखील त्रास झाला, असं रुचिताने मीडिया टॉक मराठीशी संवाद साधताना सांगितलं.
“माझ्या मनात विशालसाठी कोणताच रोमँटिक अँगल नव्हता. पण, अनेक लोक माझ्या पप्पांना येऊन बोललेत, चांगलं वाटतं का? तुमची पोरगी पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्याबरोबर लफडं करतेय. तेव्हा माझ्या पप्पांच्या पायाखालची जमीन सरकली होती. माझे बाबा कधीच हळवे होत नाहीत पण, त्यादिवशी खूप रडले होते. मला जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा फार वाईट वाटलं. कारण, मी चुकतेय तर मला बोला…त्यांना बोलून काय होणारे? तुम्ही टीव्हीवर जे बघताय ते सगळंच खरं आहे असं नाहीये. आमचं ते नातं कधीच असं नव्हतं जे तुम्हाला दाखवलं गेलंय. माझ्या टीमने, माझ्या अक्षय दादाने माझ्या सर्व कुटुंबाला या काळात सावरलं.” अशा भावना रुचिताने व्यक्त केल्या.
