Bigg Boss Marathi 6 Sagar Karande : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. शोमधून नुकतीच सागर कारंडेची एक्झिट झाली आहे. मराठी कलाविश्वाला खळखळून हसवणारा हा विनोदवीर ‘बिग बॉस’च्या घरात शंभर दिवस राहिला पाहिजे अशी त्याच्या चाहत्यांची प्रचंड इच्छा होती. पण, कमी व्होट्समुळे सागर शोमधून बाहेर झाला आहे. मात्र, ‘बिग बॉस’सारख्या शोमध्ये ८५ दिवस राहणं सुद्धा मोठी गोष्ट आहे. यामुळे अभिनेता घरी परतल्यावर कुटुंबीयांनी त्याला छान सरप्राइज दिलं.

सागरच्या कुटुंबीयांनी त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण घर सजवलं होतं. त्याचे ‘बिग बॉस’च्या घरातील फोटो सर्वत्र लावले होते. याशिवाय अभिनेत्याने शोमधील त्याच्या नावाची पाटी सुद्धा जपून ठेवल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सागर घरी आल्यावर त्याला भेटण्यासाठी खास अभिनेता अतुल तोडणकर त्याच्या घरी पोहोचला होता. याशिवाय सागरचे अन्य काही मित्र सुद्धा त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

सागर सांगतो, “आयुष्याच्या प्रत्येक Milestone वर कौतुकाची थाप देण्यासाठी कुणीतरी हवं असतं ना? तर ८५ दिवसांनी माझ्या जगात परतलोय, आपल्या माणसांनी भरलेलं घर, आपल्यासाठीच्या कौतुकाने भरलेलेले त्यांचे डोळे आणि त्यांनी मिळून आपल्यासाठी प्लॅन केलेलं सुंदर सरप्राइज… ‘हिच तर फॅमिलीची गंमत आहे!’ सध्या भारावून गेलोय. या सगळ्या अमूल्य क्षणांची शिदोरी घेऊन पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचंय. माझ्या मनात रसिक प्रेक्षकांविषयी असलेली कृतज्ञता कायम आहेच. शुभाशीर्वाद असूद्या!’

“तुम्हा सगळेजण माझ्या घरी माझं अभिनंदन करण्यासाठी आलात…थँक्यू सो मच! तुम्हा सर्वांचे खूप आभार. असेच कायम माझ्या आनंदात सहभागी व्हा. मी शोमध्ये असताना तुम्ही मला आवर्जून व्होट केलंत त्यासाठीही तुमचेही आभार!” अशा भावना सागरने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सागरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “कायम आनंदी राहा”, “दादा मस्त खेळलात तुम्ही शोमध्ये”, “तोच रुबाब…बाहेर आलो पण हरलो नाही”, “खूप शुभेच्छा सागरजी” अशा प्रतिक्रिया अभिनेत्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.