Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात एकूण आठ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत, रुचिता जामदार हे आठ सदस्य घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते.
तिसऱ्या आठवड्यात घरात ‘मिस्टर इंडिया’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं होतं. या टास्कदरम्यान, अनेक स्पर्धकांच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. आयुष संजीव घराचा कॅप्टन असल्याने या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेतून तो सेफ होता. ‘मिस्टर इंडिया’ टास्कमध्ये एकूण सात जण नॉमिनेट झाले.
याशिवाय नॉमिनेशनमधील आठवी सदस्य सोनाली राऊतने आदल्या आठवड्यात टास्क खेळण्यास नकार दिला होता, त्यामुळे ‘बिग बॉस’ने तिला थेट नॉमिनेट केलं होतं. ‘शेणाचं दार अन् मेणाचं दार’ हा टास्क पॉवर Key साठी खेळवण्यात आला होता. पण, कपडे घाण होतील असं कारण देत सोनालीने हा टास्क खेळण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर ‘बिग बॉस’ने तिला थेट नॉमिनेट केलं. याशिवाय रितेश देशमुखने सुद्धा सोनालीच्या या वागणुकीबद्दल स्पष्ट नाराजी दर्शवली होती.
अखेर सोनालीला ही चूक चांगलीच महागात पडली आहे. टास्क न खेळल्यामुळे ती तिच्या चुकीने नॉमिनेट झाली होती आणि सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चर्चांनुसार आता सोनाली घराबाहेर गेल्याचं वृत्त समोर येत आहे.
सोनाली राऊतचा घरातील प्रवास इतक्या लवकर संपेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण, या अनपेक्षित एव्हिक्शननंतर सगळ्यांना धक्का बसला आहे. आता याबाबतची स्पष्टता रविवारी प्रसारित होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांना मिळेल.
ओमकार राऊत आणि सोनाली राऊत हे दोन स्पर्धक व्होटिंग ट्रेंडनुसार बॉटम-२ मध्ये होते. पण, दिव्या शिंदेच्या चाहत्यांनी ओमकार राऊतला मोठ्या प्रमाणात सपोर्ट केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोनाली राऊत घराबाहेर झाल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत.

