Bigg Boss Marathi 6 Sonali Raut Exit : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील एकूण आठ सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होते. दर रविवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घरातून एलिमिनेट होणाऱ्या एका सदस्याचं नाव जाहीर करतो. यावेळी दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, सोनाली राऊत ओमकार राऊत आणि रुचिता जामदार या आठ जणांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. यापैकी सोनाली राऊतने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एक्झिट घेतली आहे.

व्होटिंग ट्रेंडनुसार सोनाली व ओमकार घरातील हे दोन सदस्य बॉटम-२ मध्ये होते. पण, या दोघांमध्ये सोनालीला सर्वात कमी मिळाली आहेत, यामुळेच तिचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास अवघ्या तीन आठवड्यात संपला आहे. सोनाली एव्हिक्ट झाल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होत्या. अखेर त्या सगळ्या चर्चा खऱ्या ठरल्या असून ‘बिग बॉस’च्या घरातून तिचं एव्हिक्शन झालेलं आहे.

सोनाली इतक्या लवकर घराबाहेर पडेल असं तिच्या चाहत्यांना अजिबातच वाटलं नव्हतं. घरातून बाहेर पडल्यावर रितेश देशमुखशी संवाद साधताना सोनाली राऊत म्हणाली, “मला असं वाटतं सर्वांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या…त्या मी पूर्ण करू शकले नाही. जेव्हा ‘बिग बॉस’च्या घरात मी गेले तेव्हा सगळ्या गोष्टी मला नवीन वाटल्या. घरातील अन्य सदस्यांशी मी इतकं छान जुळवून घेऊ शकले नाही.”

यानंतर सोनालीने रितेश देशमुखसह घरातील सगळ्या सदस्यांचा निरोप घेतला. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकूण १५ स्पर्धक आहेत. आता हे १५ जण मिळून पुढच्या आठवड्यात काय गोंधळ घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोनाली घराबाहेर जाईल असं अन्य सदस्यांना अजिबात वाटलं नव्हतं. त्यामुळे आता इथून पुढे प्रत्येकजण हा गेम अलर्ट राहून खेळणार आहे. सोनाली राऊतने घरातून एक्झिट घेतल्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“सोनाली तसंही काहीच करत नव्हती”, “योग्य एलिमिनेशन झालं…तिने गेम खेळणं गरजेचं होतं”, “Fair एलिमिनेशन आहे”, “सोनालीचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला होता”, “आता यानंतर ओमकार राऊत जाईल त्याचाही काहीच गेम नाहीये”, “सोनाली गांभीर्याने हा खेळ खेळत नव्हती” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.