Bigg Boss Martahi 6 Fame Sonali Raut : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमुळे अभिनेत्री व सुपर मॉडेल सोनाली राऊत सध्या चर्चेत आली आहे. २०१० मध्ये एका नामांकित कॅलेंडरसाठी तिने पहिलं बिकिनी फोटोशूट केलं होतं. यानंतर अभिनेत्रीच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती याबाबत सोनालीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये एन्ट्री घेण्याआधी सोनालीने ही मुलाखत दिली होती.
मॉडेलिंग करिअरसाठी घरच्यांचा पाठिंबा होता का? यावर सोनाली राऊत ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना म्हणाली, “माझे डॅडी सुरुवातीला सपोर्टमध्ये नव्हते. पण, माझी बहीण उज्ज्वला जी मॉडेलिंग क्षेत्रात खूप यशस्वी आहे. तिच्यामुळे माझ्या वडिलांचे विचार हळुहळू बदलले. बहिणीमुळे मला या सगळ्या गोष्टी सोप्या गेल्या. खरंतर, मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं असं मी ठरवलं नव्हतं. मी एका पार्टीला गेले होते. तिथे मला प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकर भेटले होते आणि तेव्हा मला एका नामांकित कॅलेंडरवर झळकण्याची संधी मिळाली.”
सोनाली पुढे म्हणाली, “तेव्हा सोशल मीडिया नव्हतं…त्यामुळे मॉडेलिंग म्हणजे नेमकं काय हे अनेकांना माहिती नव्हतं. काही काळासाठी असं झालेलं अरे बिकिनी आहे…आता मी बिकिनी कशी घालू? कारण…तेव्हा मला चबी फॅट होतं. त्यानंतर मग सहा महिने मी वेटलॉस केलं. रोज व्यायाम, जिम, डाएट, ट्रेनर या सगळ्या गोष्टी मी केल्या. माझं पहिलंच फोटोशूट असल्याने माझ्यासाठी सुरुवातीला गोष्टी फार कठीण होत्या. कारण, मला एकदम फिट राहायचं होतं. सुदैवाने मला खूप चांगली टीम भेटली होती. त्यामुळे फोटोशूट करताना खूप मजा आली.”
बिकिनी फोटोशूट पाहिल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? असं विचारताच सोनाली हसत-हसत म्हणाली, “घरी म्हणाले तू खूप हॉट आहेस…म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की, हिने स्वत:ला सहा महिन्यात खूप ट्रान्सफॉर्म केलंय तर माझ्यात नक्कीच स्पार्क आहे, ग्लॅमर आहे. फक्त मला अजून शिकण्याची आवश्यकता आहे…असं घरी मला सांगितलं. अजून एक गोष्ट म्हणजे तेव्हा त्या नामांकित कॅलेंडरची सर्वत्र खूप जास्त क्रेझ होती. जर तुम्ही त्या कॅलेंडरवर झळकताय तर तुम्ही नक्कीच हॉट, ग्लॅमरस, सुंदर आहात हे आपसूक समजलं जायचं. त्यामुळे बऱ्याच नवोदित मॉडेल्सला संधी मिळाली होती.”
“माझी आई तेव्हा सांगायची की, जास्त नातेवाईकांना दाखवू नकोस हे कॅलेंडर…कारण, आपले आई-बाबा आपली कायम खूप काळजी करत असतात. पण, मी एवढा विचार केलाच नाही. ज्याला जो विचार करायचाय तो करा असं ठरवून मी आयुष्यात पुढे आले.” असं सोनालीने सांगितलं.
