Surekha Kudachi on Raqesh Bapat: बिग बॉस या रिअॅलिटी शोची लोकप्रियता मोठी आहे. विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या शोचा चाहता वर्ग मोठा आहे. हिंदी, मराठी, कन्नड अशा विविध भाषांमध्ये बिग बॉस हा शो प्रदर्शित होतो.
आतापर्यंत हिंदी बिग बॉसचे १९ सीझन प्रदर्शित झाले आहेत. बिग बॉस मराठीचीही लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या सहाव्या सीझनमध्ये एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रभू शेळके, तन्वी कोलते, सागर कारंडे, राकेश बापट, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, दीपाली सय्यद, विशाल कोटियन, सचिन कुमावत, ओंकार राऊत, आयुष संजीव, करण सोनावणे, सोनाली राऊत, राधा पाटील, अनुश्री माने, दिव्या शिंदे असे स्पर्धक सहभागी झाले होते. त्याबरोबरच राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.
त्यातील राधा पाटील, सोनाली राऊत, आयुष संजीव, सचिन कुमावत, करण सोनावणे, ओंकार राऊत, दिव्या शिंदे असे काही स्पर्धक बाहेर पडले आहेत.
सुरेखा कुडची म्हणाल्या…
बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांच्या खेळाची सतत चर्चा होताना दिसते. त्यांच्या खेळाबद्दल चाहते वेळोवेळी व्यक्त होतात. अनेक कलाकार, आधीच्या सीझनममध्ये सहभागी झालेले स्पर्धक सध्या बिग बॉसच्या घरात असणाऱ्या स्पर्धकांच्या खेळावर व्यक्त होतात. आता अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी एका मुलाखतीत घरातील कोणत्या स्पर्धकांचा खेळ आवडतो यावर वक्तव्य केले आहे.
‘एसीईडी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “राकेश बापट कितपत खेळतोय ते माहीत नाही; पण तो माणूस म्हणून छान वाटतो. प्राजक्ताही चांगली वाटते. तन्वीला गेम कळला आहे; पण ती जरा बडबड जास्त करते. ते ऐकायला कधी कधी नको वाटतं. सागरसुद्धा गेम छान खेळतोय. तो सगळ्यांचे मनोरंजनही करतोय. तो सगळ्यांशी छान वागतो, सगळ्यांशी छान बोलतो. सागरला माझा पूर्ण पाठिंबा असणार आहे.” सुरेखा कुडची बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात दिसल्या होत्या.
बिग बॉसच्या घरात सध्या विविध टीम पडलेल्या दिसत आहेत. टोळी, काटा अशी गटांची नावे आहेत. तरीही एका गटातील सदस्य दुसऱ्या गटातील सदस्यांना मदत करताना दिसतात; तर अनेकदा त्यांच्यात भांडणेदेखील होतात. नॉमिनेशन, तसेच कॅप्टन्सीच्या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये भांडणे पाहायला मिळतात. अनेकदा स्पर्धक मैत्रीसाठी काहीही करतात.
आता आगामी काळात या शोमध्ये काय घडणार, तसेच कोणता स्पर्धक या आठवड्यात घराबाहेर पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
