Bigg Boss Marathi 6 Updates : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन आता चांगलाच रंगात आला आहे. रितेश देशमुखने नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर रुचिताची शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं. घरात दादागिरी करणं, सर्वांच्या अंगावर धावून जाणं याबद्दल रितेशने तिला जाब विचारला. याशिवाय जे सदस्य घरात सक्रियपणे खेळताना दिसले नाहीत त्यांनाही रितेश अलर्ट केलेलं आहे. आता आजच्या भागात घरातून बेघर कोण होणार याचा खुलासा केला जाईल. मात्र, त्याआधी रितेश भाऊच्या धक्क्यावर या सगळ्या सदस्यांबरोबर एक टास्क खेळणार आहे.
‘बिग बॉस’च्या घरात एक पंचिंग बॅग आणली जाणार आहे. घरातील प्रत्येकाचा प्रत्येकवर काही ना काही राग आहे. बिग बॉसच्या घरात हाणामारी करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे संबंधित सदस्यांवरचा राग काढण्यासाठी भाऊच्या धक्क्यावर ही पंचिंग बॅग आणली जाईल. हा टास्क गार्डन एरियामध्ये पार पडणार आहे. संबंधित सदस्याचा फोटो या पंचिंग बॅगवर लावून सगळा राग बाहेर काढायचा आहे, असा हा एकंदर
टास्क आहे. पण, यामध्ये एक मोठा ड्रामा प्रेक्षकांना तसेच रितेश देशमुखला पाहायला मिळेल.
तन्वी आणि आयुषमध्ये एवढे दिवस चांगली मैत्री होती. इतकंच नव्हे तर आयुष पहिल्या आठवड्यात गेममध्ये सक्रियपणे खेळताना दिसला नव्हता तेव्हा सुद्धा तन्वीने त्याला मार्गदर्शन केलं होतं. पण, त्यानंतर अचानक या दोघांच्या मैत्रीत दुरावा आला. याचाच जाब तन्वी त्याला पंचिंग बॅगवर त्याचा फोटो लावून विचारणार आहे.
तन्वी रागात म्हणते, “आयुष मी तुला वारंवार बोललीये…तुझ्यामध्ये मी माझा एक बेस्ट फ्रेंड बघते.” यावर स्पष्टीकरण देत आयुष सांगतो, “हो! तुझ्या अपेक्षा जास्त आहेत…ज्या मी पूर्ण करू शकत नाही.” पुढे, तन्वी त्याला सांगते, “मला नाही आवडत आहे तुझी फ्रेंडशिप…”
तन्वी यावेळी आयुषच्या फोटोवर मारताना जोरजोरात रडत असते म्हणून तो तिला अडवतो आणि म्हणतो, “हाताला लागेल बास झालं आता…” पण, तन्वी काही केल्या ऐकत नाही. पुढे ती म्हणते, “बाजूला हो आयुष…याला का कळत नाहीये की, मला त्रास होतोय या सगळ्याचा”
यानंतर पंचिंग बॅग सोडून तन्वी आयुषलाच मारू लागते. ती रडत-रडत सगळा राग आयुषवर काढते. रितेश सुद्धा हा ड्रामा पाहत असतो. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. आता तन्वीने अशाप्रकारे राग व्यक्त केल्यावर आयुष काय करणार? तो तन्वीशी प्रत्यक्ष बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर करेल का? या दोघांची मैत्री पूर्ववत होईल की, यांच्यात आणखी दुरावा निर्माण होईल? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

