Bigg Boss Marathi 6 Day 22 Promo : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षीच्या थीमनुसार दर आठवड्यात घरातील स्पर्धकांना विशिष्ट रेशन कार्ड लागू केले जातात. कॅप्टनसह टास्कमध्ये बाजी मारणाऱ्या सदस्यांना गोल्डन रेशनकार्ड मिळतं. तर, अन्य सदस्यांना टास्कच्या नियमांनुसार सिल्व्हर किंवा ब्राँझ रेशन कार्ड दिलं जातं.

ब्राँझ रेशन कार्डधारकांना घरातील कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. त्यांच्यावर लक्झरी प्रोडक्ट्स वापरण्याचीही बंदी असते. यामुळे ज्यांच्याकडे ब्राँझ रेशनकार्ड आहे असे सदस्य घरातील अन्य लोकांचं समान चोरी करत असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं आहे.

अनुश्री मानेने घरातील अनेक वस्तू चोरल्या आहेत. एकदा तिने पॉवर Key चोरली होती. चॉकलेट्स लपवून ठेवणं, घरातील राशन स्टोअर रूममध्ये जमा न करणं अशा बऱ्याच गोष्टी अनुश्रीने केल्या आहेत. याबद्दल तिला भाऊच्या धक्क्यावर सुद्धा जाब विचारण्यात आला होता.

आता चौथ्या आठड्याची सुरुवात होताच घरात पुन्हा एकदा राशन टंचाई निर्माण झाली आहे. यावेळी बेडरूममध्ये शोधाशोध केल्यावर रोशनला तांदूळ व इतर सामान तन्वीच्या बेडजवळ सापडतं. यामुळे सगळे सदस्य तन्वीने चोरी केल्याचा आरोप तिच्यावर करतात. सगळ्यांचे आरोप ऐकून तन्वी प्रचंड वैतागते. “मी चोरी केलेली नाही” असं ती ठामपणे सर्वांना सांगत असते. पण, तिचं कोणीही ऐकून घेत नाही.

शेवटी हतबल झालेली तन्वी म्हणते, “अरे मी हे सगळं नाही केलंय यार…शपथ सांगते हे सामान मी ठेवलेलं नाहीये. मला हा शो सोडायचा आहे. मला नाही करायचाय आता हा शो…मी फायनल सांगतेय, मला हा शो करायचा नाही.” यानंतर तिला अश्रू अनावर होतात.

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “हे चोर कार्ड खेळणं बोअर होतंय आता”, “या शोचं नाव आता चोर-पोलीस ठेवा”, “जर तन्वीने ही चोरी केली नसेल तर तिला आमचा फुल सपोर्ट आहे”, “हे सगळं तन्वीला त्रास देण्यासाठी होतंय”, “खरी चोर अनुश्री असणार”, “रुचिता-अनुश्री फार डोक्यात जातात”, “ही टोळी विचित्र आहे”, “बिग बॉस सॉरी पण या शोमध्ये चांगले दिसणारेच चोर आहेत” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, आता तन्वीने खरंच हे सामान लपवलं होतं की, तिला उगाच अडकवण्यासाठी हा टोळीचा डाव होता हे आजच्या भागात स्पष्ट होईल.