Bigg Boss Marathi 6 Three Wild Card Contestants : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचे आता लवकरच पन्नास दिवस पूर्ण होणार आहेत. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच एक वेगळी गोष्ट घडेल ती म्हणजे, या आठवड्यात रविवारऐवजी शनिवारीच एलिमिनेशन होईल. राकेश, रोशन, राखी आणि प्राजक्ता असे चार जण घरातून बेघर होण्यासाठी एलिमिनेट झाले होते. आता यांच्यापैकी रोशन भजनकरचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, सगळ्या स्पर्धकांना आणि ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांना एक मोठा धक्का लवकरच मिळणार आहे. हा धक्का म्हणजे एकूण ३ वाइल्ड कार्ड स्पर्धक घरात एन्ट्री घेणार आहे. सोशल मीडियावर या तिन्ही स्पर्धकांची नावं व्हायरल झाली आहेत. हे तीन स्पर्धक नेमके कोण आहेत जाणून घेऊयात…

‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेणाऱ्या तीन वाइल्ड कार्ड सदस्यांपैकी पहिली स्पर्धक आहे अभिनेत्री रेवा कौरसे. ‘टेलीचक्कर’च्या रिपोर्टनुसार अभिनेत्री रेवा कौरसे ‘बिग बॉस मराठी’मध्ये प्रवेश करणार आहे. तिने ‘दीवानियात’ आणि ‘प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती’ या हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे.

वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणारी दुसरी सदस्य आहे संस्कृती साळुंखे. रिअ‍ॅलिटी शोजमुळे संस्कृती घराघरांत पोहोचली. ‘झी मराठी’च्या ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये ती सहभागी झाली होती. तिला ‘पापा की परी’ म्हणून देखील ओळखलं जातं. आता संस्कृती ‘बिग बॉस’चा सीझन गाजवणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तर, घरात एन्ट्री घेणारा तिसरा सदस्य आहे स्टार प्रवाहचा नायक संकेत पाठक. आजवर त्याने ‘लग्नाची बेडी’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय संकेत अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या सिनेमात सुद्धा झळकला आहे. संकेतचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

bb marathi
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

दरम्यान, आता रेवा, संस्कृती आणि संकेत यांच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीची अद्याप ‘कलर्स मराठी’ वाहिनी किंवा ‘बिग बॉस मराठी’कडून घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच वाइल्ड कार्ड स्पर्धकांबाबत अधिकृतरित्या माहिती दिली जाईल. आता हे तिघं घरात गेल्यावर काय धुमाकूळ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.