Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन आता चांगलाच रंगात आला आहे. नुकतंच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य सुद्धा पार पडलं आहे. पहिल्याच आठवड्यात कोण बिग बॉसचा सीझन गाजवणार? कोणाचा घरातील वावर उत्तम आहे, कोण मनापासून गेम खेळतंय याचा एकंदर अंदाज प्रेक्षकांना येतो. याच पार्श्वभूमीवर आता लोकप्रिय अभिनेता उत्कर्ष शिंदेने पोस्ट शेअर केली आहे.
उत्कर्ष शिंदे ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. त्याच्या उत्तम खेळामुळे तो महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे एकंदर हा खेळ कशा पद्धतीने खेळला पाहिजे याचा अंदाज उत्कर्षला आहे. तो सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असतो. अनेक सामाजिक, राजकीय विषयांवर उत्कर्ष कायम आपलं मत मांडताना दिसतो. बिग बॉसचा पाचवा सीझन सुरू असताना उत्कर्षने पहिल्यापासून सूरज चव्हाणला सपोर्ट केला होता. आता अभिनेत्याने सहाव्या सीझनबद्दल आपलं मत मांडत घरातील पुरुष स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू झाल्यापासून सोनाली राऊत, तन्वी कोलते, दिपाली सय्यद, राधा पाटील या सदस्यांची नावं चांगलीच चर्चेत आहेत. पुरुष स्पर्धकांमध्ये फक्त करण सोनावणे गेम खेळत असल्याचं पाहायला मिळतंय. इतर, स्पर्धक अजूनही फ्रंट फूटवर येऊन गेम खेळत नाहीयेत. याबाबतच उत्कर्षने पोस्ट शेअर केली आहे.
उत्कर्ष शिंदे लिहितो, “हा सीझन फक्त आणि फक्त मुली हिट करतील. घरातील मुलांनो ( Boys ) आपण पुढेही सक्रियपणे खेळणार नसाल तर बाहेर या…तुमची जिमची मेंबरशिप वाया जाणार नाही.” सोनाली राऊत व तन्वी कोलते यांचा फोटो शेअर करत घरात सगळ्यात चांगला गेम सध्या मुली खेळत आहेत, असं उत्कर्षने म्हटलं आहे.

दरम्यान, पहिल्या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी एकूण ९ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. प्रभू शेळके, दिपाली सय्यद, करण सोनावणे, दिव्या शिंदे, सागर कारंडे, रोशन भजनकर, अनुश्री माने, राधा पाटील, रुचिता जामदार या नऊ जणांचा त्यात समावेश आहे. नॉमिनेटेड सदस्यांपैकी या घरात कोण टिकणार आणि कोण बाहेर पडणार हे येत्या वीकेंडला प्रेक्षकांना समजणार आहे.
