Bigg Boss Marathi 6 Captaincy Task Promo : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क बुधवारी झाला. त्यानंतर आता गुरुवारच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्क होणार आहे. बिग बॉस मराठी सीझन ६ चा पहिला कॅप्टन कोण होणार? यासाठी BB फार्म नावाचा टास्क खेळवण्यात येणार आहे. ‘कार्य कॅप्टन्सीचे, झुंज समर्थकांची’ असं या टास्कचं नाव आहे.
नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने एक ट्विस्ट आणला होता. त्या ट्विस्टनंतर पॉवर की असूनही शॉर्टकट दरवाजाने घरात आलेले तीन सदस्य नॉमिनेट झाले, तर तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता या तिघी जणी कॅप्टन्सीच्या दावेदार ठरल्या. या तिघींपैकी कॅप्टन कोण होणार, यासाठी BB फार्म नावाचा टास्क होणार आहे. त्या तिघींसाठी हा टास्क घरातील इतर सदस्य खेळतील, असं थीमवरून दिसून येतंय.
BB फार्म या कॅप्टन्सी टास्कचा पहिला प्रोमो कलर्स मराठीने शेअर केला आहे. या टास्कमध्ये विशाल कोटियन व ओमकार राऊत यांच्यात जोरदार वाद होणार आहे. जे सदस्य ज्या कॅप्टन पदाच्या दावेदाराचे समर्थक आहे, तिच्यासाठी फार्ममधील वस्तू गोळा करतील, असं दिसतंय. याचदरम्यान विशाल ओमकारच्या हातातील वस्तू घेण्यासाठी त्याला अडवतो. नंतर तो ओमकारला अशा पद्धतीने पकडतो की तो ओरडून पकडलेला गळा सोड असं बोलतो.
ओमकार विशालवर भडकतो
ओमकार विशालला ‘गळा सोड ना यार, गळा सोड, माझा गळा का दाबतोय,’ असं जोरात म्हणतो. तो कसाबसा स्वतःची सुटका करून घेतो. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद होतो. नंतर भडकलेला ओमकार विशालशी भांडतो, तेव्हा आयुष संजीव व दिव्या शिंदे मधे उभे राहून दोघांनी शारीरिक हिंसाचार करू नये यासाठी प्रयत्न करतात. ‘तू आधीच गळा दाबलेला होता,’ असं ओमकार म्हणतो. यावर विशाल ‘तू मारणार का?’ असं विचारतो. यानंतर भडकलेला ओमकार विशालला नडतो, असं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय.
बिग बॉस मराठी ६ चा प्रोमो
बिग बॉस मराठीच्या या नव्या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. मराठी बिग बॉस आहे तर भाषा पण मराठीच वापरा ना!!! अरे हे मराठी बिगबॉस आहे रे! आले बॉडी बिल्डर ताकद दाखवायला, आले प्रोटीन बार्स, डोकं फोडा आणि कॅप्टन व्हा, आधीच्या सीझन मध्ये १५ दिवसांनी भांडण सुरू करायचे पण हे पहिल्या दिवसापासून सुरू झालेत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.
पहिल्याच आठवड्यात दोन स्पर्धक हाणामारीवर आल्याने घरातील मोठ्या नियमाचं उल्लंघन होणार का? हे आज रात्री ८ वाजता पाहायला मिळेल.
