Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतीच एकूण तीन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झालेली आहे. रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंके अशी या स्पर्धकांची नावं आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी तीन वाइल्ड कार्ड स्पर्धक शोमध्ये गेल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. आता या तिघांच्या एन्ट्रीनंतर घरात काय गोंधळ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाइल्ड कार्ड स्पर्धक घरात आल्यावर सुरुवातीलाच रेवा आणि रुचिता या दोघींमध्ये वाद होतील. यानंतर विशाल-संस्कृतीमध्ये ‘पॉवर Key’ वरून मोठा गोंधळ निर्माण होणार आहे. संस्कृतीने ‘Power Key’ घेऊन या घरात एन्ट्री घेतलेली आहे. आता पहिल्या दिवसापासून या घराचा एक नियम आहे तो म्हणजे आपली ‘पॉवर Key’ आपण स्वत: सांभाळायची. संस्कृती मात्र तिची ‘पॉवर Key’ पहिल्याच दिवशी सांभाळू शकणार नाहीये.

विशाल आणि संस्कृती बोलत असतात…यादरम्यान विशाल गुपचूप मोठ्या चलाखीने ‘पॉवर Key’ आपल्या ताब्यात घेतो. दूरवर असलेली तन्वी संस्कृतीची पॉवर Key विशालच्या हातात असल्याचं पाहते आणि जोरात ओरडून सर्वांना सांगते.

यामुळे विशालने ‘पॉवर Key’ चोरल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. पण, मोठा ट्विस्ट पुढे येणार आहे. विशालकडे आपली ‘पॉवर Key’ आहे हे समजताच संस्कृती त्याला शांतपणे झोपूही देत नाही. ती विशालचा बेड खेचते, तो झोपल्यावर त्याच्या कानाजवळ खलबत्ता वाजवते. इतकंच नव्हे तर ती त्याच्या अंगावर सुरुवातीला थेंबवर पाणी टाकते.

संस्कृतीने अचानक अंगावर पाणी टाकल्याने विशाल प्रचंड संतापतो आणि जवळची बॉटल उचलून त्यामधील पाणी संस्कृतीच्या अंगावर ओततो. आता विशालने अशाप्रकारे पाणी टाकल्यावर संस्कृती काय बोलणार? या दोघांमध्ये मोठा वाद होणार का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘पॉवर Key’ चं काय होईल? विशाल संस्कृतीला तिची Key देणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही जणांनी संस्कृतीला सपोर्ट केलाय, तर अनेकांनी विशालच्या गेमचं कौतुक केलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी “विशाल आता गेममध्ये घाबरलाय…अशी चावी हिसकावून घेणं चुकीचं आहे” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.