Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रविवारी भाऊच्या धक्क्यावर एकूण ३ स्पर्धकांनी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. या स्पर्धकांची नावं आहेत रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंखे. या तिघांच्या एन्ट्रीनंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रेवा कौरासेने आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. आता रेवा ‘बिग बॉस मराठी’चं घर गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. घरात एन्ट्री घेतल्यावर पहिल्याच दिवशी रेवाचा रुचिताशी वाद होणार आहे. या दोघींमध्ये नेमकं काय घडणार याचा जबरदस्त प्रोमो नुकताच समोर आला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात रुचिताचे पहिल्या दिवसापासून प्रत्येकाशी वाद झाले आहेत. तिला एकदा भाऊच्या धक्क्यावर न बसण्याची शिक्षा सुद्धा रितेशने केली होती. रुचिता प्रचंड मोठमोठ्याने ओरडते असं बऱ्याच सदस्यांचं म्हणणं आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या रेवाने सुद्धा यावरूनच रुचिताला खडेबोल सुनावले आहेत.

रेवा तिला म्हणाली, “रुचिताचा आवाज अजून ऐकायचा नाहीये असं झालंय…” यावर रुचिता तिला म्हणाली, “मी तुला विचारलंच नाहीये…आली मोठी शहाणी” पुढे रेवा तिला पुन्हा म्हणाली, “तुला काय वाटतंय हे सगळं करून तू छान दिसतेस?”

“मी छान दिसते, वाईट दिसते मला या सगळ्याचं काहीही देणंघेणं नाहीये. डोन्ट टच मी…Get Lost!” असं थेट रुचिताने तिला सांगितलं. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

“रुचिता या सगळ्यांना पुरुन उरेल”, “रुचितामुळे खरं बिग बॉस सुरूये…चांगलं खेळतेय”, “रुचिता गप्प बसली तर बाकी कुणाचा गेमच दिसणार नाही”, “ती रुचिता आहे नेहमी भाऊच्या धक्क्यावर सॉरी बोलून मोकळी होते”, “किती वाइल्ड कार्ड आणा ती रुचिता सर्वांना पुरुन उरेल”, “रेवाला सपोर्ट तू भिड रुचिताला” अशा असंख्य प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, आता पहिल्याच दिवशी या दोघींची भांडणं झाल्यामुळे घरात पुढे काय घडणार? तीन सदस्यांच्या एन्ट्रीमुळे घरातील समीकरणं कशी बदलणार, हे तिघं जणं टोळी की काटा कोणत्या ग्रुपमध्ये सहभागी होतील? घरात नवीन ग्रुप तयार होतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागात मिळतील.